घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : कितीही येऊदेत अडथळे आता माघार नाही...; महाविकास आघाडी-भाजपला...

Lok Sabha 2024 : कितीही येऊदेत अडथळे आता माघार नाही…; महाविकास आघाडी-भाजपला आव्हान देणारे विशाल पाटील कोण?

Subscribe

सांगली – देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सांगली लोकसभा निवडणुकीची. येथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच उमेदवाराची घोषणा केली, यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह सांगलीतून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसची आहे, आणि ती आम्हालाच मिळाली पाहिजे यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरु ठेवले. सांगलीपासून मुंबई, दिल्लीपर्यंत विशाल पाटील आणि त्यांचे पाठीराखे विश्वजीत कदम यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आणि नाईलाजाने विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढावी लागत आहे.

कोण आहेत विशाल पाटील?

सांगली हा काँग्रेसचा एकेकाळी गड होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे या जिल्ह्यात वर्चस्व राहिलेले.
वसंतदादा पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय असलेले वसंतदादा नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आले. राज्यात काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय आहेत, ही वसंतदादांची देण आहे.

- Advertisement -

दादा घराण्याचा आजही सांगलीच्या राजकारणावर दबदबा आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. माजी खासदार प्रकाशबापू पाटील आणि महिला काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे ते चिरंजीव. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू असलेले चाळीशीतील विशाल पाटील 2010 पासून सक्रीय राजकारणात आहेत. विशाल पाटील यांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत, मात्र काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या नातवाला आजपर्यंत एकदाही पंजा चिन्हावर लढता आलेले नाही.

आजोबा सांगलीतून वाटायचे काँग्रेसचे तिकीट, नातवाला उमेदवारीही मिळेना !

वसंतदादा पाटील हे यांच्या घराण्याचे सांगलीत वर्चस्व होते. राज्याच्या राजकारणात दादा घराणे हे महत्त्वाचे मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत पाटील घराणे राजकारणात अस्तित्वाची लढाई लढत आहे. मात्र साखर कारखाना, जिल्हा बँक या माध्यमातून त्यांच्या नातूंनी विशाल पाटील यांनी वसंतदादांचा राजकीय वारसा कायम ठेवला आहे. ते सध्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदांवर काम करत आहेत.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ते सांगलीत बसून राज्यामध्ये तिकीट वाटप करत होते, असे बोलले जाते. मात्र आज अशी स्थिती आली आहे की त्यांच्या नातवाला विशाल पाटील यांना त्याच पक्षाची उमेदवारी मिळत नाही.
2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी होती. तेव्हा आघाडीत काँग्रेसने आपली हक्काची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. त्यामुळे विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आणि निडणूक लढवली होती. मात्र हा प्रवेश तात्पुरता होता. मात्र काँग्रेस घराण्यातील विशाल पाटलांना लोकसभेची निवडणूक पंजा चिन्हावर लढता आली नाही.
या निवडणुकीत विशाल पाटील यांचा पराभव झाला. विशाल पाटील, भाजपचे संजय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत तेव्हा झाली होती. विशाल पाटील यांना 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली. 1 लाख 60 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

- Advertisement -

2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आपल्यालाच मिळेल असा विश्वास विशाल पाटील, प्रतीक पाटील आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांना होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाने जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच चंद्रहार पाटील यांना सांगलीची उमेदवारी घोषित करुन टाकली. यामुळे या तिन्ही नेत्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसह दिल्ली श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या पण काहीही उपयोग झाला नाही. जागावाटप जाहीर झाले तेव्हा सांगली शिवसेना ठाकरे गटाकडेच कायम ठेवण्यात आली. उलट खासदार संजय राऊत यांनी विदर्भातील रामटेक आणि कोल्हापूर या मतदारसंघांच्या बदल्यात सांगली आम्ही घेतली असे सांगत काँग्रेस विशाल पाटलांची समजूत काढले असे म्हटले. यातून स्पष्ट झाले की काँग्रेस नेते आपला पारंपारिक मतदारसंघ राखण्यात अपयशी ठरले.

विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि आज (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी माघार घेण्यास नकार देत, उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा दादा घराण्यातील काँग्रेस नेत्याला, दादांच्या नातवाला पंजा ऐवजी दुसऱ्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. निवडणूक आयोगाना विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह दिले आहे.

विशाल पाटील यांचा मतदारसंघात कायम संपर्क

वसंतदादा पाटलांचे नातू हा राजकीय वारसा सोबत असलेले विशाल पाटील सांगलीमध्ये विविध सामाजिक कामातून जनतेच्या संपर्कात असतात. वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी अत्याधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक संस्था उभी केली आहे. जिल्ह्यातील महिलांच्या हाताला काम आणि कलागुणांना वाव देण्यासाठी ‘मी सक्षमा’ सारखा मंच उपलब्ध करुन दिला आहे. वसंदादाचा वैचारिक आणि राजकीय वारसदार म्हणून विशाल पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबापू पाटील घराण्यातील वादाचा फटका

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष हा त्यांच्या आताच्या पिढीतही कायम राहिला आहे. 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्याविरोधात काम केल्याचे बोलले जाते. जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांचे काम तर केलेच नाही, पण ते लोकसभा निवडणुकीत कसे पडतील यासाठी प्रयत्न केल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीची मते ही आघाडीच्या उमेदवाराऐवजी भाजपकडे वळवली गेल्याचा आरोप तेव्हा होत होता.
आताही विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, याची काळजी काही बडे नेते घेत होते, अशी जिल्ह्यात चर्चा आहे. विशाल पाटील यांचे नाव आणि चिन्ह मतदारांना कळू नये यासाठी काही नेत्यांनी उमेदावारांची संख्या वाढवली. ज्यामुळे मतदानासाठी एकाऐवजी दोन यंत्र वापरले जातील आणि दुसऱ्या यंत्रावर विशाल पाटील यांचे नाव आणि चिन्ह येईल अशी ‘काळजी’ घेतली गेल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. सांगली मतदारसंघात 21 उमेदवार आहेत आणि मतदानासाठी दोन यंत्रांचा वापर होणार आहे.

विशाल पाटील यांच्यासमोरील आव्हान

विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी म्हटले आहे की मी सांगलीकरांचा उमेदवार आहे. त्यांच्या या बंडखोरीवर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत सत्यजीत तांबेंवर पक्षाने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतरही ते नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले. तेव्हाही शिवसेनेनेच (ठाकरे गट) तिथे उमेदवार दिला होता.

विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. ते जनतेपर्यंत पोहचवणे हे त्यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. तसेच भाजपसोबत लढत असतानाच महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतही त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. आक्रमक युवा नेता अशी त्यांची ओळख आहे. तर स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्य हाही त्यांचा स्वभावगुण आहे. साखर कारखाना, शिक्षण संस्था आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी शहर आणि ग्रामीण भागात संपर्क वाढवला आहे. त्याचा आता त्यांना निवडणुकीत किती फायदा होता, हे 4 जून रोजी समोर येईल.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : सांगलीत आता तिरंगी लढत; विशाल पाटलांनी महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली


Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -