घरमहाराष्ट्रदुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाले आहे. १० मतदारसंघातील २० हजार ७१६ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे.

राज्यात दहा मतदारसंघात उद्या गुरुवारी म्हणजे १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून २० हजार ७१६ मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.

निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम मशीन

या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी १० उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. या व्यतिरिक्त बुलढाणा मतदारसंघात १२ उमेदवार, अकोला ११, अमरावती २४, हिंगोली २८, नांदेड १४, परभणी १७, उस्मानाबाद १४ आणि सोलापूर मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. १५ पेक्षा जास्त उमेदवार असलेले ४ मतदारसंघ असून यापैकी बीड मतदार संघात एका कंट्रोल युनिटमागे ३ बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य ६ मतदारसंघात प्रत्येकी १ बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम (३७ हजार ८५० बॅलेट युनिट आणि २४ हजार ८५० कंट्रोल युनिट) तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

- Advertisement -

निवडणूक निरीक्षक करणार लाईव्ह वेबकास्ट

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे १० टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाईव्ह वेबकास्ट पाहतील.

दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ

बुलढाणा- १९७९ मतदान केंद्र (एकूण मतदार १७ लाख ५९ हजार)
अकोला – २०८५ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ६१ हजार)
अमरावती – २००० मतदान केंद्र, (एकूण मतदार १८ लाख ३० हजार)
हिंगोली- १९९७ मतदान केंद्र (एकूण मतदार १७ लाख ३२ हजार)
नांदेड – २०२८ मतदान केंद्र (एकूण मतदार १७ लाख १८ हजार)
परभणी – २१७४ मतदान केंद्र (एकूण मतदार १९ लाख ८४ हजार)
बीड – २३२५ मतदान केंद्र (एकूण मतदार २० लाख ४१ हजार)
उस्मानाबाद – २१२७ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ८६ हजार)
लातूर – २०७५ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ८३ हजार)
सोलापूर – १९२६ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ५० हजार)

- Advertisement -

मतदानासाठी आवश्यक ११ दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -