घरमहाराष्ट्रLok Sabha : शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंत...

Lok Sabha : शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर…; तानाजी सावंत यांची धुसफूस बाहेर

Subscribe

मंत्री तानाजी सावंत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर इशारा दिला की, शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक आणि मी स्वतः सहन करणार नाही.

धाराशिव : महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महायुतीकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं, तसेच धाराशिवमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी मंत्री तानाजी सावंत यांची धुसफूस बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांनी इशारा दिला की, शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक आणि मी स्वतः सहन करणार नाही. (Lok Sabha Election 2024 If one constituency of Shiv Sena continues to decrease Tanaji Sawant ajit pawar)

तानाजी सावंत म्हणाले की, आज थोड मी परखड बोलणार आहे. 26 जानेवारीला महायुतीचे धनंजय सावंत यांनी प्रचार सुरू केला आहे. हा मतदार कडवट शिवसैनिकांचा आहे. तो बाणा ते कधीही सोडणार नाहीत. पण तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले की, हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ्याला सोडायचा. पण या प्रकारे शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक आणि मी स्वतः सहन करणार नाही, असा इशाराच तानाजी सावंत यांनी भर सभेत दिला.

- Advertisement -

हेही  वाचा – Lok Sabha 2024 : मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

तानाजी सावंत म्हणाले की, धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. इथून शिवसेनाचा खासदार जास्त वेळेस निवडून गेलेला आहे. फक्त एक वेळ राष्ट्रवादीचा खासदार निवडून गेला आहे. त्यामुळे आम्हा शिवसैनिकांवर हा अन्याय आहे. मात्र अबकी बार 400 पार असा नारा आहे. विश्वनेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपले दुःख विसरून शिवसैनिकांना मानाचा मुजरा आणि विनंती करतो की, अर्चना पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन करतानाच अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करून उभा राहीन, असंही तानाजी सावंत म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार?

दरम्यान, तानाजी सावंत यांनी जाहीर केलेल्या नाराजीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांची खंत बोलून दाखवली असली तरी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता त्यांनी महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न करावे, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील. त्या दोघाचं ऐकून घेऊन ते योग्य तो मार्ग काढतील, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

हेही वाचा – Lok Sabha : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान; इतर राज्यांची परिस्थिती काय?

तानाजी सावंत का नाराज?

दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत विद्यमान खासदार हा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आला होता. त्यामुळे तानाजी सावंत या जागेसाठी आग्रही होते. पण राष्ट्रवादीसाठी ही जागा सुटली आणि भाजपाचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे तानाजी सावंत हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी आजच्या महायुतीच्या धाराशिवमधील प्रचारसभेत जाहीरपणे बोलूनही दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -