घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : राज्याची तिजोरी वैयक्तिक एफडी आहे का? आव्हाडांचा अजितदादांना...

Lok Sabha 2024 : राज्याची तिजोरी वैयक्तिक एफडी आहे का? आव्हाडांचा अजितदादांना प्रश्न

Subscribe

मतदारांना दिलेल्या इशाऱ्याला निवडणूक आयोग गांभीर्याने घेणार आहे की, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेले प्रत्येक बेकायदेशीर विधान सोडून देणार आहे, असा खोचक प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील एक सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निधीवाटपावरून त्यांनी मतदारांना अप्रत्यक्षपणे धमकावले आहे. यासंदर्भात ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, राज्याची तिजोरी वैयक्तिक एफडी आहे का? असा प्रश्न अजित पवार यांना केला आहे.

महाराष्ट्रातील बारातमी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार विरुद्ध पवार असा सामना तिथे होणार आहे. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे अशी लढत येथे होणार आहे. या अटीतटीच्या लढतीत अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

- Advertisement -

पुण्यातील इंदापूर येथे अजित पवार यांची काल, बुधवारी सभा झाली. आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कोणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ, पण तुम्हीदेखील ईव्हीएमचे बटण पटापट दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता राहील, असा इशाराच त्यांनी मतदारांना दिला.

- Advertisement -

यावर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्याची तिजोरी, करदात्यांच्या कष्टाच्या पैशाने भरलेली आहे की ती अजित पवार यांची वैयक्तिक एफडी आहे? असा प्रश्न करून ते म्हणाले की, बारामतीने आपल्या उमेदवाराला मतदान केले तरच निधी दिला जाईल, असे त्यांचे विधान लाचखोरीचे, आचारसंहितेचा भंग आणि मुख्यत: त्यांचा हेतू उघड करणारे आहे.

गुरूचा विश्वासघात करून पक्ष बदलणे, भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्याच्या नावाखाली पक्ष बदलाचे समर्थन करणे, बेकायदेशीर सरकार स्थापन करणे, सार्वजनिक निधीला केवळ वैयक्तिक संपत्ती समजणे आणि मतांसाठी लोकांना ब्लॅकमेल करणे, असा प्रकार अजित पवार यांचा आहे. सरकारमधील असे लोक आपल्या राज्याच्या प्रतिष्ठेला कलंकीत करत आहेत, असे सांगून, निवडणूक आयोग या गोष्टी गांभीर्याने घेणार आहे की, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेले प्रत्येक बेकायदेशीर विधान सोडून देणार आहे, असा खोचक प्रश्न त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हवा ही अशीच बनत असते, ठाकरे गटाचा मोदी यांच्यावर निशाणा


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -