घरताज्या घडामोडीSharad Pawar : लबाडा घरचे आवताण... मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही;...

Sharad Pawar : लबाडा घरचे आवताण… मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही; माढ्यातील सभेतून पवार बरसले

Subscribe

माढा – सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. 10 वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला मागतात. लबाडाच्या घरचे अवताण जेवल्याशिवाय खरं नाही, असे म्हणत शरद पवारांनी मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याची टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. काकासाहेब ताठे, उत्तमराव जानकर, संजय कोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे, नगराध्यक्ष मिनल ताठे, पुण्याच्या माजी महापौर प्रभा व्यवहारे आदी मंचावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणला आहे. आदिवासींची स्थिती खालावली आहे. मोदींनी गेल्या दहा वर्षांत फक्त महात्मा गांधी, पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंवर टीका केली. जे लोक हयात नाही, त्यांच्यावर ते टीका करतात, असा टोला शरद पवारांनी लगावला.

- Advertisement -

दहा वर्षात देशात बेरोजगारी वाढली 

2014 मध्ये मोदींनी सांगितले की आम्ही बेरोजगारी संपवू. बेरोजगारीचे सर्वेक्षण करणाऱ्या जागतिक दर्जाची संस्था इंटरनॅशनल लेबर ऑर्गोनायझेशन (ILO) ने सर्वेक्षण केले त्यात भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे सांगत आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांनी गेल्या दहा वर्षांत काय केले? असा सवाल करत शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात नोटाबंदी केली. त्यामुळे सामान्य लोकांना कित्येक दिवस रांगेत उभे राहावे लागले. देशभरात 700 लोकांचा बँकांच्या रांगेत उभे राहून मृत्यू झाला. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. त्यावर मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत.

तुम्ही काहीच केले नाही, आणि हिशेब आम्हाला विचारता

शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची 2014 मधील ऑडिओ क्लिप जाहीर सभेत ऐकवली. त्यात त्यांनी महागाई वाढल्याचा ठपका तत्कालिन सरकारवर ठेवल्याची आठवण शरद पवारांनी करुन दिली. ते म्हणाले की, दहा वर्षांपासून राज्य तुमच्याकडे आहे. दिलेला शब्द पाळला नाही. 50 दिवसांमध्ये महागाई कमी करणार होते. 10 वर्षांत 60-70 रुपये लिटर मिळणारे पेट्रोल 110 रुपयांवर गेले आहे. गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. तुम्ही काहीच केले नाही, आणि हिशेब आम्हाला विचारता, असा सवाल शरद पवारांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा; पंतप्रधान मोदींच्या आरोपांना काय उत्तर देणार

देश हुकूमशाहीच्या दिशेने – शरद पवार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली म्हणून केजरीवालांना तुरुंगात टाकले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर टीका केली तर तिथेही त्यांना तुरुंगात टाकले आहे. इंग्रजांसारखे काम सध्या केंद्रातील सरकार करत आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे, असा आरोप शरद पवारांनी केला.

या देशात मी अनेक पंतप्रधान पाहिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, पी.व्ही.नरसिंहराव, मनमोहनसिंह हे सर्व पंतप्रधान पाहिले. या सर्व पंतप्रधानांनी देशाला एक ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र नरेंद्र मोदींचे गेल्या दोन, तीन दिवसांतील भाषण पाहिले. देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी असते की शिख असेल मुस्लिम असेल सर्वांना एक ठेवण्याचे काम देशाच्या नेतृत्वाने करायचे असेत, मात्र मोदींकडून तसे होतांना दिसत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -