घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून रामाचा जप; ठाकरेंची भाजपावर टीका

Lok Sabha 2024: पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून रामाचा जप; ठाकरेंची भाजपावर टीका

Subscribe

केंद्रात आधी इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि मग त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने महाराष्ट्रात पाडला आहे, तो भरून काढू आणि महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करुन देऊ, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केला.

मुंबई: भुताची भीती वाटली की रामाचा जप करतात तसेच पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यावर आता ते राम राम करू लागले आहेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी भाजपावर जोरदार टीका केली. केंद्रात आधी इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि मग त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने महाराष्ट्रात पाडला आहे, तो भरून काढू आणि महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करुन देऊ, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केला. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray Criticized BJP over taking Ram Name in Election Rally )

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा आज प्रकाशित करण्यात आला. मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा वचननामा जाहीर करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भुताची  भीती वाटल्यानंतर, रामाचा जप करायचा, भूतं पळायची असे म्हटले जायचे हे सर्व आपण ऐकले आहे. खरं-खोटं मला माहिती नाही. मात्र आता भाजपाची अवस्था अशीच काहीशी झाल्याचे दिसते. भाजपला आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने, ते आता राम राम म्हणायला लागले आहेत. त्यांचा हा नेहमीचाच उद्योग आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करत आहे. त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी महायुतीवर केली.

- Advertisement -

मला 2014 सालचा किस्सा आजही आठवतो. आम्ही युतीमध्ये होतो. युतीमधील घटक पक्ष म्हणून आम्ही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो होतो, तो क्षण माझ्या डोळ्यांसमोर आहे. बऱ्याच वर्षांनी देशात एका पक्षाची सत्ता आली होती, त्यामुळे स्वत: राष्ट्रपतीही आश्चर्यचकीत होते. भाजपने त्यावेळी बहुमताच्या आकड्याला स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. मग 2019 साली ते पुन्हा सत्तेत आले. त्यांनी कलम 370 काढले, आम्ही तेव्हाही सोबत होतो. आता मात्र त्यांची पाशवी इच्छा समोर आली आहे. त्यांना पाशवी बहुमत पाहिजे जेणेकरुन ते देशाची घटनाच बदलून टाकतील, देशातील लोकशाही मारुन टाकतील. ही त्यांची स्वप्न उघड झाली आहेत, अशी कठोर टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत. हिरे व्यापार पळवले, क्रिकेटचा सामना पळवला, फिल्मफेअर कार्यक्रम पळवले, सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. महाराष्ट्राचे वैभव लुटले जात आहे. ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवू, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी वचननाम्याच्या माध्यमातून दिली. महाराष्ट्राचे वैभव परत मिळवून देताना आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाहीत. प्रत्येक राज्याला मानसन्मान देऊ. सगळ्या राज्यांना जे आवश्यक असेल ते देऊ. शिवाय वित्तीय केंद्र हे नव्याने महाराष्ट्रात उभारु. जेणेकरुन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

इंडिया आघाडीने विस्तृत असा जाहीरनामा दिलेला आहे. सत्तेतील भागीदार पक्ष म्हणून शिवसेना त्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा आग्रही राहील. देशातील लोकशाहीवर आलेले संकट आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला निर्माण झालेला धोका वेळीच लक्षात आल्याने महाराष्ट्रातील जनता जागृत झालेली आहे. ही सजग आणि स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीला मजबूत पाठिंबा देईल, असा विश्वासही उद्धव  ठाकरे  यांनी व्यक्त केला.

मोदी-शहा तुळजाभवानीच्या मंदिरात का जात नाहीत?

मी राम मंदिरात गेलो नसल्याचे भाजपवाले म्हणतात. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या  दिवशी तर मी नाशिकच्या काळाराम मंदिरातच होतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात इतक्या वेळा येतात. पण ते तुळजाभवानीच्या मंदिरात का जात नाहीत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी  यावेळी केला.

ठाकरे गटाच्या वचननाम्यातील आश्वासने

■ ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद करून घेणार. महाराष्ट्रावरील आकसापोटी अहमदाबाद येथे हलविण्यात आलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र पुन्हा मुंबईत स्थापन करून  ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार

■ आरक्षण आणि सामाजिक न्याय

आरक्षणाची मर्यादा  ५०  टक्क्यांवरून वाढविण्यासाठी आग्रही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच आर्थिक व अन्य मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत वाढविणार

■ आरोग्य रक्षण

सर्वांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, या सूत्रानुसार आरोग्य सेवेतील उणीवा दूर करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालये आधुनिक उपकरणांसह सुसज्ज करणार. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार.

(हेही वाचा: Lok Sabha : सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर भाजपाची सडकून टीका)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -