घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : महिलांना उमेदवारी देण्यात भाजप आघाडीवर; मात्र समान हक्क देण्यात...

Lok Sabha 2024 : महिलांना उमेदवारी देण्यात भाजप आघाडीवर; मात्र समान हक्क देण्यात महाराष्ट्र अजुनही पिछाडीवर

Subscribe

राज्यातील लोकसभेच्या एकूण जागांपैकी पाव तुकडा तेवढा महिला राजकारण्यांच्या वाट्याला आला आहे. 48 पैकी 15 जागांवर महिलांना प्रमुख चार राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे.

मुंबई – लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणारे विधेयक याच वर्षाच्या सुरुवातीला मंजूर झाले आहे. या विधेयकाचे श्रेय घेणाऱ्या सर्वच पक्षांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत किती महिलांना प्रतिनिधीत्व दिले, हा आकडा सर्वच राजकीय पक्षांना शरमेने मान खाली घालायला लावणार आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु करणाऱ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र. महात्मा फुलेंची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी किती महिलांना उमेदवारी दिली ते जाणून घेऊया.

यंदा राज्यात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाची माहिती पहिल्या टप्प्याच्या मतदानाची तारीख जवळ आल्यानंतर जाहीर केली आहे. तर महायुतीचा घोळ निवडणूक जाहीर होऊन 25 दिवस झाल्यानंतरही संपलेला नाही. महाविकास आघाडीत अवघ्या पाच जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी राहिले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक तर काँग्रेसकडे असलेल्या चार जागा आहेत. महायुतीतही वेगळे चित्र नाही. त्यांच्याकडूनही अद्याप सात जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे जाहीर झालेल्या उमेदवार यादीवरुनच महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख चार पक्षांमध्ये आणि त्यांच्या दोन फुटीर गटांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीवरुन त्यांनी महिलांना लोकसभा निवडणुकीत किती प्रतिनिधीत्व दिले आहे, हे तपासले असता हा आकडा पुरोगामी महाराष्ट्राला, महिला शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला खचितच अभिमानास्पद नाही.

- Advertisement -

राज्यातील लोकसभेच्या एकूण जागांपैकी पाव तुकडा तेवढा महिला राजकारण्यांच्या वाट्याला आला आहे. 48 पैकी 15 जागांवर महिलांना प्रमुख चार राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. त्यातही काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केल्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या 14 वर आली.

- Advertisement -

कोणत्या पक्षात सर्वाधिक महिला उमेदवार

सत्ताधाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजपने सहा महिलांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये नंदूरबारमधून खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित, जळगावमध्ये स्मिता वाघ, रावेर मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रविण पवार, आणि नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या पाच महिलांना भाजपने तिकीट दिले आहे. तर बीडमधून प्रितम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा गोपीनाथ मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने सहा महिलांना उमेदवारी दिली आहे. यातील चार जणी 2019 मध्येही खासदार होत्या, दोन नवीन महिला उमेदवार सत्ताधारी भाजपने दिले आहेत.

भाजपसोबत गेलेल्या शिंदेच्या शिवसेनेने एका महिला खासदाराचे तिकीट कापले आणि दुसऱ्या महिलेला दिले आहे. यवतमाळ-वाशिम येथून पाचवेळच्या खासदार भावना गवळी यांचे तिकट कापले आहे. तिथे राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ पाटील यांचे माहेर आहे. हिंगोलीतून तिकीट कापण्यात आलेले हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. हेमंत पाटलांना हिंगोलीतून काढून यवतमाळला पाठवले असाही त्याचा अर्थ विरोधक काढत आहेत. शिंदेच्या शिवसेनेने एकाच महिलेल तिकीट दिले आहे.

भाजपसोबत गेला दुसरा फुटीर पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, यांनी महायुतीत बऱ्यापैकी जागा राखल्या आहेत. अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून तर धाराशिव मतदारसंघात अर्चना पाटील यांना भाजपमधून आयात करुन उमेदवारी दिली आहे. दादांच्या पक्षाने या दोन महिलांना तिकीट दिले आहे.

supriya and sunetra
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार

महिला धोरणाचा गाजावाजा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्षांच्या कन्येशिवाय इतर एकाही जागेवर महिलेला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाडून खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे या लोकसभा गाजवणाऱ्या खासदार आहेत. त्यांना संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पुरोगामीत्वाचा बडेजाव करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकाधिक महिला कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पालघरमध्ये भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. येथे महायुतीला अजुनही त्यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करता आलेला नाही. तर ठाकरेंनी कल्याणमध्ये मोठी खेळी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंविरोधात एकनिष्ठ शिवसैनिक वैशाली दरेकर – राणे यांना मैदानात उतरवले आहे. ठाकरेंच्या दोन्ही महिला उमेदवार या त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामामुळे परिचित आहेत. त्यांचे त्या मतदारसंघात असलेल्या कामाच्या जोरावर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सर्वाधिक जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला अजुनही महिलांमध्ये आपले संघटन वाढवता आले नसल्याचे त्यांच्या एकल उमेदवार संख्येवरुन जाणवते. महाविकास आघाडीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी दोन महिलांना त्यांनी उमेदवारी दिली होती. त्यात एक सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे तर रामटेकमध्ये रश्मी बर्वे. विशेष म्हणजे हे दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी रश्मी बर्वेंचा अर्ज जात प्रमाणपत्रामुळे निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता एकमेव प्रणिती शिंदे याच महिला उमेदवार आहेत.

48 मतदारसंघापैकी प्रमुख राजकीय पक्षांनी फक्त 14 महिलांना उमेदवारी दिली आहे. महिलांना समान हक्क दिले पाहिजे असे सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते बोलत असतात. मात्र राजकारणात हे चित्र अजुनही समाधानकारक म्हणावे तसे नाही. याचा सर्वच राजकीय नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे.

हेही वाचा : Lok Sabha : प्रचारात पारदर्शकतेला प्राधान्य, निनावी राजकीय जाहिरातबाजीला निवडणूक आयोगाचा चाप

महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना हात राखून दिले आहे. मात्र राज्यातील महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी 2004 मध्ये झाली होती. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 2019 मध्ये झालेल्या मतदार नोंदणीच्या आकडेवारीनुसार 8.73 कोटी मतदारांपैकी 47% महिला मतदार आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : रश्मी बर्वेंना सर्वोच्च धक्का; निवडणूक रद्द निर्णयाला स्थगितीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -