घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : रश्मी बर्वेंना सर्वोच्च धक्का; निवडणूक रद्द निर्णयाला स्थगितीची...

Lok Sabha 2024 : रश्मी बर्वेंना सर्वोच्च धक्का; निवडणूक रद्द निर्णयाला स्थगितीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Subscribe

नवी दिल्ली – काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. रश्मी बर्वे यांचा लोकसभेचा अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. तिथे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर बर्वे यांनी उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी विशेष परवानगी याचिका दाखल केली. ही याचिकाही फेटाळण्यात आली आहे. यामुळे रश्मी बर्वेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

जात प्रमाणपत्रमुळे उमेदवारी रद्द 

रश्मी बर्वे यांना काँग्रेसने रामटेकमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरण समोर आले. विरोधी पक्षासह अपक्ष उमेदवारींनी रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला. या आक्षेपांची पडताळणी करुन निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द केली. या संदर्भात रश्मी बर्वेंचा युक्तीवाद होता की, जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सामाजिक न्याय विभागाने बेकायदेशीरपणे माझ्यावर कारवाई केली. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी त्यांनी नागपूर खंडपीठात अर्ज केला होता.

- Advertisement -

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने 4 एप्रिल रोजी सुनावणी घेऊन जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. मात्र न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यामुळे रश्मी बर्वे यांची लोकसभा उमेदवारी रद्द करण्याच्या आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला रश्मी बर्वे यांनी विशेष परवानगी याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या रश्मी बर्वे यांच्या विशेष परवानगी याचिकेवर बुधवारी ( 10 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती संदीप मेहता, न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला. यामुळे रश्मी बर्वे यांचा अर्ज आता सर्वोच्च निर्णयाने बाद ठरला आहे.

- Advertisement -

कशी आहे रामटेकमध्ये लढत?

रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. येथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट शिंदेच्या शिवसेनेने कापले. त्यांनी काँग्रेस आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन रामटेकची उमेदवारी दिली आहे. कृपाल तुमाने यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता. शिंदेच्या शिवसेनेविरोधात काँग्रेसने येथे रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर आता त्यांचे पती श्याम बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची रामटेकमधील डोकेदुखी वंचितनेही वाढवली आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : Pawar Vs Pawar : मुलगी ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते! अजित पवारांना शरद पवारांचे थेट उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -