आमच्या बंडाचे ३३ देशांनी कौतुक केले; एकनाथ शिंदेंचा नेमका टोला कोणाला?

आमच्या बंडाचे ३३ देशांनी कौतुक केले. मी कमी बोलतो आणि जास्त ऐकतो, असे म्हणत राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. पंढपुरात एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता

आमच्या बंडाचे ३३ देशांनी कौतुक केले. मी कमी बोलतो आणि जास्त ऐकतो, असे म्हणत राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. पंढपुरात एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात या मेळाव्याला शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी “आमदरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन”, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. या पुजेनंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकार्पणाच्या कार्यक्रमांना हजेर लावली. त्यानंतर शिंदे यांच्या पंढरपुर दौऱ्यात शेवटी शिंदे गटाकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी केलेल्या बंडाची माहिती दिली. तसेच, आमच्यावर अन्याय झाल्याचे म्हटले.

“५० आमदारांनी विश्वास दाखवणे ही साधी गोष्ट नाही. ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील ३३ देशांनी कौतुक केले आहे. मी कमी बोलतो आणि जास्त एकतो. सभागृहात देखील मी कमी बोललो. पण वेळ आल्यावर सगळं सांगेन” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. शिवाय, “हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे”, असेही शिंदे यांनी म्हटले.

“आज केवळ आंनद दिघे यांच्या आशीर्वादाने इथे उभा आहे. धर्मवीरमध्ये सगळा प्रसंग दाखवता आला नाही. गेल्या वीस ते २२ वर्ष झाले माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. पण मी डगमगलो नाही. आताही डगमगणार नाही. मी जास्त बोलत नाही, शिवाय टिकाकारंना कामातून उत्तर देईन.”, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाकडून एकमेकांचा व्हीप उल्लंघन तसेच तसेच १६ आमदार आमदार अपात्रतेची कारवाई आणि सत्तांतराला देण्यात आलेले आव्हान या सर्व बाबींवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानुसार, बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात न्यायालयीन दिलासा कोणाला मिळणार याचा निकाल उद्या ११ जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. देशामध्ये लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही? हे उद्या कळेल, असे त्यांनी म्हटले.


हेही वाचा – न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका