ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत- अजित पवार

मधल्या काळात ठरवलं तर निवडणूक आयोग ते करू शकतं. ते करावं अशी आमची रास्त मागणी असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय

ajit pawar

पुणेः ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम पूर्ण झालं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणालेत. अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो की, निवडणुका होत असताना ओबीसी समाजाच्या संदर्भातलं जे प्रतिनिधित्व आणि आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे ते आरक्षण न देता या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण असून, 12 तारखेला सुनावणी आहे. आता इम्पेरिकल डेटासंदर्भात बरेचसं काम झालेले आहे. बांठियांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्यांनी ते काम मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलेले आहे. 12 तारखेला सुप्रीम कोर्टानं ते मान्य करायला हवं. मध्य प्रदेशचं मान्य केलंय, तर महाराष्ट्राचंही मान्य करायला हवं, अशी आमची अपेक्षा आहे. त्या निवडणुका ओबीसींना प्रतिनिधित्व देऊनच लावाव्यात. नाही म्हटलं तरी 22 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत. मधल्या काळात ठरवलं तर निवडणूक आयोग ते करू शकतं. ते करावं अशी आमची रास्त मागणी असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय.

उद्धव ठाकरेंची शिवसेना ही त्यांची मूळ शिवसेना- अजित पवार

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या निलंबनाच्या सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलंय. मधल्या काळात जी स्थितंतरं घडली, त्यातून नक्की नियम काय सांगतो, कायदा काय सांगतो, पक्षांतर बंदी कायदा त्यावेळी अस्तित्वात आला, त्यावेळेस त्यात कशाकशाचा अंतर्भाव केलेला होता. ते सर्व विधितज्ज्ञ आणि प्रख्यात वकील आपापल्या परीनं भूमिका मांडतात. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही त्यांची मूळ शिवसेना आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हालाही वाटतं दिसताना तरी ते तसं दिसतंय. पण सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार आहे हे मी सांगू शकत नाही. ते आपल्याला उद्याच कळेल, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात का?

महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात का असे विचारले असता ते म्हणाले, मी उद्या मुंबईला जाणार असून, तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांशी बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या यावर निर्णय होणार आहे, असंही ते म्हणाले.


हेही वाचाः न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका