घरमहाराष्ट्रदूध उत्पादकांना मिळणार १ ऑगस्टपासून प्रति लिटर २५ रुपये दर

दूध उत्पादकांना मिळणार १ ऑगस्टपासून प्रति लिटर २५ रुपये दर

Subscribe

आज १ ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर २५ रुपये दर देण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दर्शवली आहे.

काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संपाच्या जोरावर आता आज १ ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर २५ रुपये दर देण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दर्शवली आहे. नागपूरमध्ये राज्य सरकार आणि दूध संघाच्या मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यभर दुधाचं आंदोलन पेटल्यानंतर राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनामध्ये १९ जुलै रोजीच दुधाला २५ रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता. तर ही नवी दरवाढ २१ जुलैपासून लागू करण्यात यावी असंही जाहीर केलं होतं. मात्र, गोकुळ, वारणा असे काही दूध संघ वगळता इतर खासगी आणि सहकारी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. तर काही संघांनी तांत्रिक कारणांमुळं वेळ वाढवून देण्याची मागणीदेखील केली होती. याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये सरकारच्या घोषणेनुसार १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना २५ रूपये प्रति लिटर दर मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे.

गुणवत्तेची अट शिथील

अनुदानासाठी दुधाच्या गुणवत्तेची अट ३.२ टक्के फॅट आणि ८.३ टक्के एसएनएफ अशी शिथील करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असून मान्यता दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर, जे दूध संघ उत्पादकांना २५ रुपये दर देणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. दरम्यान मागच्या वर्षी महाराष्ट्रात गायीच्या दुधासाठी गुणवत्तेची अट ही ३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ अशी होती, तर म्हशीच्या दुधासाठी ६.५ टक्के फॅट आणि ९ टक्के एसएनएफ अशी होती, ज्याची किंमत आता साधारण ४१ ते ४२ रुपये प्रति लिटर दरम्यान आकारण्यात येणार आहे. तर टोन्ड मिल्कमधील गुणवत्तेची अट ३ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ इतकी असून त्याची किंमत ४२ रुपये प्रति लिटर इतकीच राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -