घरआतल्या बातम्याकोरोना रूग्णसंख्या कमी करण्याचा महाराष्ट्राचा डाव केंद्राने हाणून पाडला, डॉ प्रदीप व्यास...

कोरोना रूग्णसंख्या कमी करण्याचा महाराष्ट्राचा डाव केंद्राने हाणून पाडला, डॉ प्रदीप व्यास यांना फटकारले

Subscribe

आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी RTPCR चाचणीत CT व्हॅल्यू कमी करण्याची विनंती ICMR कडून नामंजुर

राज्यात कोरोना संसर्गाने हाहा:कार माजला आहे. मुंबईत रोज १० हजार तर राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमिडेसिवीर, बेड, हॉस्पिटल यांची कमरता आहे. त्यामुळे नागरीक कमालीचे हतबल झाले असताना राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी त्यावर तोडगा काढण्याऐवजी लपवालपवीचे धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला मुख्यमंत्री पारदर्शक कारभाराच्या आणाभाका घेत असताना कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी आरोग्य सचिवांनी कोरोना चाचणीचे (आरटीपीसीआर) निकष बदलण्याची विनंतीच थेट केंद्र सरकारला म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) पत्राद्वारे केली. त्यावरून आयसीएमआरने आरोग्य सचिवांना फटाकले असून ते राज्यातील जनतेच्या जिवावर बेतण्याचा इशाराच दिला आहे.

काय आहे पत्रातील उल्लेख ?

आरटीपीसीआर चाचणीमधील परिमाण ३५ सीटी वरून २४ सीटी राज्य सरकारची शिफारस आयसीएमआरने फेटाळून लावली आहे. परिमाण कमी केले तर कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसेल. मात्र, तरीही सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण हे सुपरस्प्रेडर होऊन महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट होईल, अशी भीतीही आयसीएमआरने व्यक्त केली आहे.आपलं महानगर – माय महानगरकडे आयसीएमआरने डॉ. प्रदीप व्यास यांना लिहीलेल्या ५ एप्रिलच्या पत्राची प्रत आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आयसीएमआरला १ एप्रिल २०२१ रोजी एक पत्र लिहिले होते. त्यात व्यास यांनी ३५ सीटी परिमाण २४ सीटी असे आरटीपीसीआरचे निकष बदलण्यास मान्यता देण्यात यावी, अशी विनंती केली होती. मात्र, ही विनंती आयसीएमआरने फेटाळून लावली. एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे की नाही हे त्याच्या सीटी मूल्यावरून निश्चित होते. जागतिक स्तरावर हे सीटी मूल्य, अर्थात परिमाण ३५ ते ४० ठरवण्यात आले आहे. ज्या रुग्णांचे सीटी परिमाण ३५ किंवा त्यापेक्षा कमी आहे ते रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ठरवले जातात. तर ज्या रुग्णांचे सीटी परिमाण ३५ पेक्षा जास्त त्यांना निगेटिव्ह मानले जातात. सीटी परिमाण २४ पर्यंत कमी करणे योग्य नाही. त्यामुळे अनेक कोरोनाग्रस्तांची नोंद होणार नाही आणि त्यामुळे ते रुग्ण कोरोनाचे सुपरस्प्रेडर होतील, असे आयसीएमआरने डॉ. प्रदीप व्यास यांना ५ एप्रिल २०२१ रोजी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये दररोज 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. ही वाढती रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा यामुळे महाराष्ट्र सरकार दिवसेंदिवस हतबल ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य विभाग आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) कोरोनाशी संबंधित आरटीपीसीआर चाचण्यांमधील सायकल थर्शहोल्डचे (सीटी) परिमाण कमी करण्यासाठी पत्र लिहिले होते.

RTPCR letter

- Advertisement -

RTPCR चाचणीतील परिमाण नेमके काय ?

कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरटीपीसीआर ही चाचणी महत्त्वाची आहे. या चाचणीमधील परिमाण 35 सीटीपेक्षा जास्त आल्यास रुग्ण निगेटिव्ह म्हणून जाहीर केला जातो. तर 35 सीटीपेक्षा कमी आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह म्हणून जाहीर केला जातो. मात्र यामध्येही जर परिमाण हे 0 ते 16 सीटी दरम्यान असेल तर रुग्णामध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे असतात. 16 ते 24 सीटी असेल तर रुग्णामध्ये कोरोनाची मध्यम स्वरुपाची लक्षणे असतात आणि 24 ते 35 सीटी असेल तर रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असतात. यामध्येही ज्या रुग्णाच्या चाचणीमध्ये परिमाण 35 सीटी दाखवण्यात येते त्याची पुन्हा चाचणी केली जाते. त्यामुळे राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचणीमधील पॉझिटिव्हचे परिमाण 35 सीटीहून 24 सीटी करण्याची केलेली मागणी म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी करण्यासाठी घातलेला एकप्रकारे घाट होता. आयसीएमआरच्या समयसूचकतेमुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा जीव वाचला. कोरोनाचे संक्रमण यामुळे आटोक्यात आले नसते, असाही खुलासा आयसीएमआरकडून करण्यात आला आहे.

परिमाण 24 सीटी केल्यास काय होईल

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 31 लाख 6 हजार 828 असून, त्यातील 6 लाख 70 हजार 388 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमधील तब्बल 5 लाख 92 हजार 964 रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचे परिमाण हे 24 सीटी केल्यास राज्यातील 5 लाख 92 हजार 964 रुग्ण हे आपोआप निगेटिव्ह ठरतील तर 77 हजार 424 रुग्णच पॉझिटिव्ह ठरतील. यामध्येही 18 हजार 741 रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे तर ऑक्सिजन बेडची आवश्यकता असलेले 36 हजार 228 रुग्ण आणि मध्यम लक्षणे असलेले रुग्णच यामध्ये राहतील. मात्र सौम्य लक्षणे असलेले 5 लाखांपेक्षा अधिक रुग्ण निगेटिव्ह ठरतील, ते सुपरस्प्रेडर ठरून राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालतील. त्यामुळे आयसीएमआरने राज्य सरकारच्या धुडकावलेल्या मागणीमुळे नागरिक मोठ्या संकटातून वाचले आहेत.

सीटी हे आरटीपीसीआर चाचणीमध्ये विषाणू कोणत्या स्टेजला सापडले हे मोजण्याचे एकक आहे. आरटीपीसीआर चाचणीमध्ये संशयित कोरोना सॅम्पल व्हीटीएममध्ये घेतले जातात. या व्हीटीएम मशीनमध्ये एकत्रितरित्या फिरवल्या जातात. मशीनमध्ये ज्या सायकलला व्हीटीएममध्ये कोरोनाचे विषाणू सापडतील. त्या सायकलची नोंद सायकल थर्शहोल्ड म्हणजेच सीटी म्हणून केली जाते. दरम्यान, आरोग्य सचिव डॉ. प्रदीप यांना प्रतिक्रियेसाठी आपलं महानगरने फोन केला असता त्यांनी तो उचलला नाही. तसेच एसएमएस, व्हॉटसअ‍ॅप पाठवून प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एसएमएसलाही उत्तर दिलेले नाही.

कोण आहेत डॉ. प्रदीप व्यास ?

डॉ. प्रदीप व्यास हे १९८९ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव आहेत. येत्या २०२३ साली ते निवृत्त होणार आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांनी राज्य निवडणूक आयोग, अर्थखात्याचे सचिवपद भूषवले आहे. मागील चार वर्षे ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे ते सचिव होते आणि सध्या याच खात्याचे ते प्रधान सचिव आहेत. आदर्श घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते. या घोटाळ्यात ते दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -