डोईजड होऊ नये म्हणूनच पंकजा मुंडेचा पत्ता कट, फडणवीसच भाजपात किंग

विधानपरिषद निवडणुकीचे बिगूल वाजल्यावर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर पाठण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा ह्या कोणत्याही पदासाठी पात्र असून त्यांना विधानपरिषदेसाठी माझा पाठिंबा आहे असे म्हटले होते. मात्र, उमेदवारीचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेते हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वााने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवर फडणवीस यांचे वर्चस्व असल्याचे दिसते.

विधानपरिषद निवडणुकीसाठी (maharashtra legislative council elections) भाजपने (bjp) पाच उमेदवारांची नावे बुधवारी जाहीर केली. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. भाजपाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांना संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या गटाला यश आले आहे. तर भाजप महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना उमेदवारीची अपेक्षा होती. पण त्यांनाही भाजपने उमेदवारी नाकारली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव यावेळी चर्चेत होते. पण भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत आणि पंकजा यांच्यासह अनेक चर्चेतील नावांचा पत्ता कट करत उमा खापरे यांना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. खरे तर पक्षात डोईजड होऊ नये म्हणूनच पंकजा मुंडे यांचा पत्ता देवेंद्र फडणवीस यांनीच कट केल्याचे बोलले जाते. यापूर्वी पक्षांतर्गत आव्हान मिळू शकतील असे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), विनोद तावडे (Vinod Tawd), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) हे तुल्यबळ नेते होते. मात्र, त्यांचे खच्चीकरण करण्यास फडणवीस यांना यश आले. एकनाथ खडसे यांना तर पक्ष सोडण्यासही भाग पडले. तर विनोद तावडे आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यामुळे सध्या तरी पंकजा यांच्याशिवाय फडणवीस यांना आव्हान देईल असा नेता प्रदेश भाजपमध्ये उरला नव्हता. त्यामुळे विधानपरिषदेमार्फत पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात पुन्हा येणे हे फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली असती.

भाजपाने प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात आले आहे. मात्र, चर्चेत नसलेले्या श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiy) आणि उमा खापरे (Uma Khapre) या दोन नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमा खापरे यांना संधी दिल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी असलेल्या पंकजा मुंडे यांना डावलून ओबीसीच चेहरा असलेल्या खापरे यांना विधानपरिषदेवर पाठवून राज्यसभेप्रमाणे जातीचे गणित भाजपाने साधले आहे.

बड्या नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या यादीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेच वर्चस्व असल्याचे दिसते.  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरेकर हे २००९ ते १४ या कालावधीत मनसेचे आमदार होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले. तसेच त्यांना विरोधी पक्षनेते पदही दिले. दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली.

प्रसाद लाड यांचीही भाजपात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले लाड हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. २०१७ मध्ये नारायण राणे यांनी विधानपरिषद सदस्याचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लाड यांना भाजपने उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत लाड यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव करत विधानपरिषदेत प्रवेश केला. आता पुन्हा एकदा भाजपने त्यांना संधी दिली आहे. दुसरीकडे श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देऊन भाजपाने जेष्ठ नेत्यांना धक्का दिला आहे. श्रीकांत भारतीय हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे त्यांचे ओएसडी होते. सध्या ते भाजपचे राज्य संघटन सचिव आहेत. एक अभ्यासू नेत, शिवसेनेवर आक्रमकपणे शाब्दिक हल्ला करणे ही त्यांची ओळख आहे.

विधानपरिषदेची लाॅटरी लागलेल्या उमा खापरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका होत्या. तसेच त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे त्यांच्या त्या समर्थक होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करत खापरे यांचे नाव पुढे केल्याने पंकजा यांच्या समर्थकांसाठी धक्का आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना,  पंकजा यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण दिल्लीतून त्यांच्या नावावर सहमती झाली नाही असा दावा केला असला तरी पंकजा यांचे तिकीट कापण्यात देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची दबकी चर्चा प्रदेश भाजपा कार्यालयाबाहेर होती. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस एके देवेंद्र फडणवीस हेच नेतृत्व असल्याने पंकजा यांच्या रूपाने आणखी एक नेतृत्व उभे राहिणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले असते.

विधानपरिषद निवडणुकीचे बिगूल वाजल्यावर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर पाठण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा ह्या कोणत्याही पदासाठी पात्र असून त्यांना विधानपरिषदेसाठी माझा पाठिंबा आहे असे म्हटले होते. मात्र, उमेदवारीचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेते हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वााने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवर फडणवीस यांचे वर्चस्व असल्याचे दिसते. धक्कादायक म्हणजे पंकजा यांचे समर्थक असलेले राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ओबीसी चेहरा असलेल्या खापरे आणि धनगर समाजाचा चेहरा असलेले राम शिंदे यांना तिकिट देताना भाजपने जातीय समीकरण साधले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.  त्यानंतर आता विधान परिषदेच्या निमित्ताने पंकजांचे राज्याच्या राजकारणात पुनर्वसन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. पंकजा यांना डावलण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात न आणण्यासाठी उमेदवारी नाकारल्याचे बोलले जाते. मात्र, यामागेही मोठी राजकीय खेळी आहे. सध्या राज्यात राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचे पक्षावर एकहाती नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत मास लीडर असलेल्या पंकजा ह्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या स्पर्धक असतील. पंकजा यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. २०१४ मध्ये भाजपाने मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड केली, त्यानंतर परळीतील एका सभेत त्यांनी मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे जाहीर विधान केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी त्या दावेदार होत्या. पंकजा यांच्याशिवाय फडणवीस यांना सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आव्हान देईल असा दुसरा नेता राज्यात भाजपामध्ये नाही. त्यामुळे पंकजा यांनी राष्ट्रीय राजकारणातच ठेवण्याची खेळी या निमित्ताने खेळल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे पंकजा यांनी विधानपरिषदेवर पाठवले तर विरोधी पक्ष नेतेपदाचा मोठा पेच निर्माण होऊ शकतो. प्रवीण दरेकर यांचे  विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात आले असते. कारण दरेकर हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदावर पंकजा यांचा दावा असेल. पंकजा यांना डावलणेही भाजपसाठी कठीण असेल. अशा परिस्थिती पंकजा विरोधी पक्ष नेत्या झाल्यास फडणवीस यांना त्यांचे मोठे आव्हान असेल. त्यामुळेही त्यांना डावलल्याची चर्चा आहे.