घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

Subscribe

काँग्रेसचे मन वळवण्यात पवारांना यश,काँग्रेसकडून राजेश राठोड या एकमेव उमेदवाराची घोषणा

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने धरलेला दोन जागांचा आग्रह आणि त्यामुळे निवडणुकीचा घोडेबाजार होण्याची शक्यता, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना याविषयी स्पष्ट कल्पना दिल्याने अखेर काँग्रेसने विधान परिषदेकरिता दोन जागांचा आग्रह सोडून एका जागेवरील उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर बिनविरोध निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून उद्धव ठाकरे 11 मे रोजी अर्ज भरणार असून विधान परिषद उपसभापती निलम गोर्‍हे यासुद्धा सोमवारी अर्ज भरतील.

जालन्यातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी दिल्याची घोषणा काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी केली आहे. येत्या 21 मे रोजी विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. पक्षीय बलाबलनुसार शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 4 आणि काँग्रेसचा 1 असे 9 उमेदवार विधान परिषदेवर सहजगत्या निवडून जाऊ शकतात. मात्र, राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी झालेल्या समझोत्यानुसार काँग्रेसला विधान परिषदेच्या दोन जागा लढवायच्या होत्या. काँग्रेसमध्ये याकरता इच्छुकांची प्रचंड गर्दी होती. मात्र, त्यातही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नसीम खान व माणिकराव ठाकरे यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. मात्र, भाजपप्रमाणे काँग्रेसनेही ज्येष्ठांना धक्का दिला असून जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सचिन सावंत यांच्याबरोबरच नसीम खान व माणिकराव यांनाही विधानप रिषदेकरता काँग्रेसने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस दोन जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, काँग्रेसच्या घोषणेमुळे निवडणुका होऊन घोडेबाजार होण्याची शक्यता होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार काँग्रेसने शनिवारी एकाच उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे महाआघाडी आणि भाजप या दोघांमध्ये लढत न होता बिनविरोध निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला. शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना उपनेत्या नीलम गोर्‍हे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, अजित गोपछडे, गोपीचंद पडळकर आणि रणजीत सिंह मोहिते पाटील अशा चार जणांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली आहे, तर आता शेवटी काँग्रेसने राजेश राठोड या एका उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे 21 मे रोजी होणार्‍या नऊ जागांसाठी असलेल्या निवडणुकीकरता नऊ उमेदवार रिंगणात असल्यामुळे घोडेबाजार टळला असून बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -