घरमहाराष्ट्रराज ठाकरे महाविकास आघाडीचे इंजिन!

राज ठाकरे महाविकास आघाडीचे इंजिन!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एखादा विषय उचलला की त्यानंतर तो विषय शिवसेनेकडून उचलण्यात येतो आणि त्यावर आक्रमक भूमिका घेण्यात येते. असे मनसेच्या स्थापनेनंतर बरेच वेळा झालेे आहे. त्यामुळे मनसे हे शिवसेनेचे इंजिन आहे, असे म्हटले जाऊ लागले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एखादा विषय उचलला की त्यानंतर तो विषय शिवसेनेकडून उचलण्यात येतो आणि त्यावर आक्रमक भूमिका घेण्यात येते. असे मनसेच्या स्थापनेनंतर बरेच वेळा झाले आहे. त्यामुळे मनसे हे शिवसेनेचे इंजिन आहे, असे म्हटले जाऊ लागले. आता शिवसेना सत्तेत आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय उचलून धरला आहे. त्याची व्यापक दखल घेऊन त्यासंबंधीचे नियमन राज्य सरकारला करावे लागले आहे. त्यामुळे राज ठाकरे हे केवळ शिवसेनेचेच नव्हे, तर राज्यातील महाविकास आघाडीचेही इंजिन झाल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेत मनसैनिकांना एक राजकीय कार्यक्रम दिला तो म्हणजे भोंगे लावणार्‍या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानेच स्पष्टतेसाठी राज ठाकरेंनीच पुन्हा ठाण्यात उत्तर सभा घेतली. आता भोंग्याच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकीकडे पोलीस बंदोबस्तात ठिकठिकाणी वाढ झालेली आहेच, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात संवेदनशील ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचा गृहविभाग कामाला लागला आहे. अशातच धार्मिक तेढ निर्माण होऊन अनुचित प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडालेली आहे. एकूणच राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी राज्याचा गृहविभाग कामाला लागला आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदींच्या भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावण्याचा गृहपाठ दिला आहे खरा, पण मनसेच्या राजकीय पक्ष म्हणून कारकिर्दीतला आतापर्यंतचा अजेंडा हा अनेकदा शेवटच्या मनसैनिकापर्यंतच पोहचलेला नाही हे आतापर्यंतच्या अनेक उदाहरणांतून समोर आले आहे.

- Advertisement -

मनसेने पक्ष स्थापनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधातील धोरण हाती घेतले. रोजगारामध्ये स्थानिकांना प्राधान्य हे मनसेच्या सुरुवातीच्या अजेंड्यामध्ये प्रामुख्याने दिसले. त्यामध्ये रेल्वे भरतीचा मुद्दा हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात गाजला. त्यासोबतच मराठी पाट्या लावण्याचे धोरणही प्रशासनाला अमलात आणावे लागले. या दोन्ही मुद्यांवर मनसेने अनेक शहरांत तसेच राज्यातही लोकप्रियता मिळवली खरी. परप्रांतीय आणि मराठीचा मुद्दा या दोन्ही मुद्यांवर मनसेला अनेक ठिकाणी नगरसेवक आणि आमदार निवडून आणता आले, पण सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना भिडणारा असा कार्यक्रम त्यानंतरच्या काळात मनसेला देण्यात तितकेसे यश आले नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर सभेत केलेल्या खुलाशानुसार रकानेच्या रकाने हे पत्रकार आपल्या सोयीने अर्थ लावून भरतात असा मुद्दा मांडला. अनेकदा पत्रकार आपल्या मनात एक सभेचा अजेंडा घेऊन येत असतात, त्याच अजेंड्याने लेखांची आणि बातम्यांची मांडणी होत असते. याचे सोपे उदाहरण देताना राज ठाकरेंनी आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेश’ चित्रपटाचे उदाहरण दिले. ‘लगान’सारखा ऑस्कर नॉमिनेशनला गेलेला चित्रपट घडवलेला दिग्दर्शक हा स्वदेशसारखा चित्रपट तयार करून एक वेगळाच अपेक्षाभंग करतो, असे प्रांजळ मत राज ठाकरेंनी आपल्या प्रतिक्रियेतून दिले होते, पण राज ठाकरेंनी मी स्वतः एक चित्रपट मनात घेऊन गेलो होतो, ते म्हणजे आशुतोष गोवारीकर यासारख्या दिग्दर्शकाच्या प्रतिभेमुळे हे त्यांनीच कबूल केले होते.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातील सभेत पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेचा संबंध लावणे यामध्ये काही गैर नाही. राज ठाकरे यांनीच आतापर्यंत राजकीय पक्ष म्हणून सेट केलेल्या नॅरेटिव्हजमुळेच राज ठाकरेंनी आतापर्यंतच्या निवडणुकांना सामोरे जाताना जी राजकीय रणनीती लोकांसमोर आणली त्यामधूनच राज ठाकरेंबाबतचे नॅरेटिव्हज सेट होत गेले. त्यामध्ये नाशिक महापालिका आणि ब्ल्यू प्रिंट यांसारख्या पुढाकारांचा अपवादच म्हणावा लागेल. त्याव्यतिरिक्त मात्र मनसेने आपली वेगळी अशी छाप समाजात पाडण्यात कोणतीही विशेष मेहनत घेतली नाही. त्याचाच प्रत्यय हा मनसेच्या पक्षातील नेत्यांच्या क्रमावलीतून दिसून येतो.

अलीकडच्या दशकातील मुंबईतील आव्हाने आणि मुंबईसमोरील आव्हाने त्यासोबतच राजकीय पक्षांची कामगिरी याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात याआधीच्या दशकातील कामगारांचे विषय, रोजगाराचे, सहकाराचे आणि राहणीमानाचे विषय हे गेल्या काही वर्षांमध्ये बदलले आहेत. मुंबईतून हद्दपार झालेल्या मोठ्या उद्योगांमुळे तसेच व्यवसायांमुळे मुंबईतील कामगार संघटनांची शिस्त विस्कटली. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर पक्ष बांधणीसाठी उपयुक्त ठरणार्‍या कामगार बांधणीचा एक मोठा बेस आपण शहर म्हणून गमावला. मनसे अशा विषयांच्या बाबतीत कमनशिबी ठरले, असेच म्हणावे लागेल.

रोजगाराच्या निमित्ताने मराठी स्थानिक भूमिपुत्रांसाठीचा मनसेच्या सुरुवातीच्या काळातील रेल्वे भरतीचा विषय, परप्रांतीयांविरोधातील धोरण आणि मराठी पाट्या सक्तीचा विषय सोडला तर थेट सर्वसामान्यांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणार्‍या विषयांचे सातत्य हे पक्ष संघटना म्हणून प्रामुख्याने मांडण्यात मनसेला यश मिळाले नाही. अशा मुद्यांचे सातत्य राखण्यात आणि मुद्दे शोधून काढण्यातही मनसेला विशेष यश आले नाही. मनसेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात पक्षीय कामगार संघटनांची वर्णी लागली खरी, पण त्यामागे तितकासा कामगार वर्ग पाठीशी उभा राहिला नाही. मुंबईत येणार्‍या परप्रांतीयांच्या लोंढ्यांच्या निमित्ताने राज ठाकरेंची टीका ही केवळ तोंडीच राहिली. हे लोंढे रोखण्यासाठीचा कोणताही राजकीय कार्यक्रम मनसेने हाती घेतला नाही. उलट मनसेने या परप्रांतीयांच्या मुद्यावर स्थानिक पातळीवर धोरण आणणे गरजेचे होते, पण या विषयावर मनसे फक्त सत्ताधार्‍यांना जबाब विचारत राहिली.

त्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना किंवा मनसैनिकांना कार्यक्रम मिळाला नाही. मराठी पाट्यांच्या निमित्तानेही खळखट्याकचा आवाज अनेकदा आला खरा, पण मराठी पाट्या लागताच हा विषयही संपुष्टात आला. स्थानिक महापालिका पातळीवर मराठी पाट्यांसाठीची मोहीम ही मनसे पक्ष स्थापनेनंतर हिट झाली, पण त्यानंतर 2022 साल हे राज्यव्यापी मराठी पाट्यांचे धोरण आणण्यासाठी उजाडले हेदेखील विसरून चालणार नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या आग्रहावरून गुजरात दौरा केला. अनेकदा मोदींचे गोडवे गायलेले पाहायला मिळाले. गुजरातमध्ये झालेला विकास त्यांच्या प्रत्येक ओळीत उल्लेखासाठीचा होता खरा, पण त्यानंतर मात्र मनसेने या संपूर्ण प्रकरणात यू टर्न घेतला आणि पीआर स्टंट होता अशी कबुली दिली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक आर्थिक विषयांवर देशपातळीवर मोदी सरकारला आलेले अपयश दाखवले खरे, पण देशातील रोजगारी, अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्यांची थेट गवसणी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घालण्यात राज ठाकरे मात्र अपयशी ठरले. ना मनसैनिकांपर्यंत हे मुद्दे पोहचले ना मतदारांपर्यंत. परिणामी निकाल हा मनसेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या परफॉर्मन्समध्ये साफ दिसून आला. विधानसभेतही काही राजकीय पक्षांना डॅमेजचे तर काही राजकीय पक्षांना डॅमेज कंट्रोल करण्याचे काम करण्याच्या भूमिकेत मनसे दिसून आली, पण त्याचाही विशेष असा फायदा मनसेला पक्ष म्हणून झाला नाही.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मनसेने ठाणे, पुणे, मुंबई यांसारख्या ठिकाणी कंबर कसत राजकीय आखणीला सुरुवात केली होती, पण त्यामध्येही निवडणुका पुढे लांबल्याने मनसेला हादेखील मनसैनिकांचा गृहपाठ अर्ध्यातच सोडावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा मनसैनिकांची कोंडी झाली. निवडणुका नाहीत, राजकीय कार्यक्रम नाहीत, अशातच कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी काय करता येईल हादेखील पक्ष म्हणून मनसेसमोरील मोठा विषय आहे. आता मनसैनिकांना भोंग्याच्या विषयामुळे नवा गृहपाठ मिळाला आहे. या गृहपाठात मनसेच्या झेंड्यासोबत उतरलेले मनसैनिक हे नाराजीचा झेंडा घेत बाहेर पडले. मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा गृहपाठ जेव्हा मनसैनिकांना मिळाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलतानाही जितका विचार केला, त्यापेक्षाही कमी विचार हा हनुमान चालिसा लावण्याच्या निमित्ताने केला असावा. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये याचे काय पडसाद उमटतील याचा थोडा तरी अंदाज घेणे गरजेचे होते, पण एकूणच कार्यकर्ते आणि समाजाच्या नाराजीला मनसेला थेट सामोरे जावे लागणार आहे. राज्यात मनसेने हनुमान चालिसेचा मुद्दा घेत एका समाजाची व्होट बँक सरळच सोडून दिली आहे. हे सगळे एकाच फटक्यात झालेले नाही.

राज ठाकरे हे नाशिकमध्ये असताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घेतलेली भेट हे सगळ्या विषयाला सुरुवात व्हायचे कारण आहे. त्यानंतर कृष्णकुंजवर चंद्रकांत पाटील आले खरे, पण या सगळ्यात एक मुद्दा होता तो म्हणजे विचारसरणीचा. राजकीय विचारसरणी एकसारखी असणार्‍या समविचारी पक्षांसोबत आम्ही जायला तयार आहोत. मनसेने विचारसरणीच्या बाबतीत जुळवून घेतल्यास मनसेसोबत युतीचा विचार करता येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सुचवले होते. त्याचाच प्रत्यय हा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यासाठी स्पिकरच्या भोंग्याच्या निमित्ताने येत आहे.

मनसेप्रमुखांची हिंदुत्वाच्या मुद्यावर अयोध्येच्या दौर्‍याची घोषणा, मनसैनिकांना हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम या सगळ्या गोष्टींचे बिंदू जोडले तर ते विचारधारेशी जोडले जातात. भाजपच्या रांगेत जाऊन बसण्यासाठी मनसेचा सुरू झालेला प्रयत्न हा लपून राहिलेला नाही. मनसेसाठी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी आणि बदललेली भाषा हेच एकूणच राजकीय समविचारी पक्ष म्हणून सुरू झालेल्या खटाटोपाचे लक्षण आहे. म्हणून राजकीय अस्तित्वासाठी मनसेने केलेला हा प्रयत्न नक्कीच साधासोपा नाही. देश, राज्य आणि स्थानिक पातळीवर बेरोजगारी, गरिबी, अर्थव्यवस्था अशा सगळ्या विषयांची छाप पडत नाही हे लक्षात येताच राजकारणात सर्वसामान्यांना थेट भिडणारा विषय तो म्हणजे धर्माचा.

याच सोप्या स्ट्रॅटेजीने मनसे आता मैदानात उतरली आहे. त्यामध्ये भाजपसोबतची विन विन सिच्युएशन जमवत आपले अस्तित्व टिकवण्यात मनसेने उभारी घेतली तर मनसेला स्काय इज द लिमिट, असंच काहीसं म्हणावं लागेल. कारण आज राज ठाकरे जे विषय मांडत आहेत, तेच एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मांडत होते. म्हणजे हे विषय खरे शिवसेनेेचे आहेत, पण आता शिवसेनेने शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचे बाळासाहेबांना जे वचन दिले होेते, त्याची पूर्ती करण्यासाठी मुख्यमंत्रिपद मिळवले. त्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यांची महाविकास आघाडी तयार झाली.

सत्ता आणि मुख्यमंत्रिपद मिळाले, पण सोबत असलेल्या सत्तेतील सहकार्‍यांच्या विचारसरणीमुळे त्यांना स्वत:वर मर्यादा घालाव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या मनात जरी असले तरी खुलेपणाने बोलता येत नाही. त्यामुळे तेच विषय आज राज ठाकरे यांनी उचलले आहेत. त्यामुळे शिवसेनेने सत्तेसाठी मौन धारण केल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती आता राज ठाकरे भरून काढत आहेत. त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय काढला. सुरुवातीला सत्तेतील लोकांनी तो फिजुल विषय आहे, हे म्हणून उडवून देण्याचा प्रयत्न केला, पण हा बहुसंख्य लोकांच्या मनातील विषय आहे हे लक्षात आल्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली. आता कुठल्याही धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी तर भोंग्यांविषयीचे नियम भंग करणार्‍याला कारावास आणि दंडाची शिक्षा जाहीर केली आहे. एकूणच काय तर आजवर राज ठाकरे हे शिवसेनेचे इंजिन म्हटले जात होते, पण राज यांनी भोंग्यांविषयी भूमिका घेतल्यानंतर सरकारला व्यापक दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळे राज ठाकरे आता महाविकास आघाडीचेही इंजिन ठरले आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -