घरमहाराष्ट्रअंदाज पावसाचा वाटे खरा असावा...

अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…

Subscribe

पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध हवामान संस्थांचे अंदाज प्रसिद्ध होत असतात. ऑस्ट्रेलियामधील संस्थेचा हवामान विषयक अंदाज बर्‍याचदा तंतोतंत ठरतो, असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी या संस्थेने भारतातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तविला असून तो दिलासा देणारा आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध हवामान संस्थांचे अंदाज प्रसिद्ध होत असतात. ऑस्ट्रेलियामधील संस्थेचा हवामान विषयक अंदाज बर्‍याचदा तंतोतंत ठरतो, असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी या संस्थेने भारतातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तविला असून तो दिलासा देणारा आहे. सरासरीच्या ९८ टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस बरसेल असा तो अंदाज होता. या अंदाजापाठोपाठ स्कायमेटने वर्तविलेला अंदाजही जवळपास असाच आहे. समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले असणार आहे.

मान्सूनच्या पहिल्या टप्प्याचा हा दीर्घकालीन अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांत पावसाची स्थिती त्या मानाने दिलासादायक राहिली. मात्र जागतिक हवामानातील बदल आपल्या देशाच्या मुळावर उठल्याची परिस्थिती आहे. अचानक येणारी वादळे, त्यांचे वाढलेले प्रमाण, वाढती उष्णता अशा एक ना अनेक कारणांमुळे पावसाचे वेळापत्रक कोलमडून पडत आहे. यंदाचा मान्सून सुरू होण्यास जेमतेम दोन महिने राहिले तरी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात अवकाळी पाऊस दगाफटका करीत आहे. आपल्याकडे पाणी साठवणुकीचे योग्य नियोजन नसल्याने शेती बरीचशी पावसावर अवलंबून आहे.

- Advertisement -

पावसाने आपला हिसका दाखविला की शेती व्यवसायच कोलमडून पडतो. अधिक पाऊस झाला तरी शेतीचे तीन तेरा वाजतात. त्यामुळे हवामान अंदाजाकडे सर्वांचे लक्ष असते. पावसाचे दिलासा देणारे अंदाज जेव्हा बाहेर येतात तेव्हा शासन यंत्रणांनाही हायसे वाटते. यंदाही या यंत्रणा वर्तविण्यात आलेल्या मान्सून अंदाजामुळे सुखावल्या असतील. १९७१ ते २०२० या कालावधीतील आकडेवारी विचारात घेऊन दीर्घकालीन सरासरी जाहीर करण्यात आली आहे. हा अंदाज खरा ठरला तर शेतीला तो उपकारकच ठरणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या ९९ टक्के किंवा अधिक म्हणजे १०२ ते १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी ९८ टक्के पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले होते. प्रत्यक्षात ही सरासरी ९९ टक्क्यांवर पोहचली. तसेच हा पाऊस त्याच्या वेळापत्रकाच्या पलीकडे जाऊन रेंगाळला होता. त्यामुळे शेतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. कोकणात रेंगाळलेल्या पावसात हजारो हेक्टरवरील पिकाचे प्रमाण कमी झाले. यंदा दुष्काळाची शक्यता १४ टक्के आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे ठिकठिकाणी दुष्काळाचा सामना दरवर्षी करावा लागत आहे. यात कोट्यवधींचे नुकसान होते. २०२१ मध्ये १४ जूनला सुरू होणारा मान्सून लांबणीवर गेल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर आले. प्रशांत महासागरात ला-निनाची स्थिती आहे. ही स्थिती चांगला पाऊस पडण्यास हातभार लावत असते. मात्र या परिस्थितीत बदल झाला तर पावसाच्या वेळापत्रकाचे काही खरे नसते.

- Advertisement -

पर्यावरणात असमतोल निर्माण झाल्यामुळे पावसानेही हुलकावणी देण्यास सुरुवात केलेली आहे. वर्तविण्यात येणारा अंदाज चुकीचाही ठरू शकतो. भारतात यापूर्वीचे पावसाचे अंदाज ‘अंदाज पंचे’ या सदरात मोडणारे असत. अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातील हवामान संस्था भारतातील हवामानाचे अंदाज वर्तवत त्यावेळी त्याची खिल्लीही उडविण्यात येत असे. पाऊस आणि वादळामुळे देशात नुकसान होण्याचे प्रमाण वेगाने वाढल्यानंतर हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी आधुनिक यंत्रणा असावी, याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्याची पूर्तताही हळूहळू होत गेली. गेल्या काही अंदाजांकडे पाहिल्यास ते बरेचसे खरे ठरल्याचे लक्षात येते.

परंतु यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. आपल्याकडे वर्तविण्यात येणार्‍या हवामानाचा किंवा पावसाचा अंदाज मोघम असतो. देशात पावसाचे प्रमाण चांगले राहील असे सांगितले जाते त्याचवेळी ईशान्येतील राज्यांतून पावसाचे कमी होत चाललेले प्रमाण चिंता वाढविणारे ठरते. मेघालयातील चेरापुंजी येथे सर्वाधिक पावसाची नोंद होते. हा विक्रम मोडून काढण्याची कामगिरी महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये पार पडलेली आहे. याचाच अर्थ यापुढे पाऊस कोणत्या भागावर विशेष कृपा करेल हे सांगता येणार नाही किंवा सर्वाधिक पावसाची नोंद होणारी ठिकाणे भविष्यात बदललेलीही असू शकतात.

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कोकणात सर्वाधिक आहे. तर शेजारी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुके समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत कायम असतात. विशेष म्हणजे धो-धो पाऊस बरसणारा महाबळेश्वर तालुका याच सातारा जिल्ह्याचा भाग आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाच्या प्रमाणात असमतोल दिसून येतो. याचा परिणाम शेतीवर होतो. पावसाचे प्रमाण कमी-अधिक असल्याने शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे शेती विकून टाकण्याकडे शेतकर्‍यांचा वाढलेला कल चिंताजनक आहे. कृषी विभागाने ठराविक अंतराचे भाग किंवा पॉकेट तयार करून त्या-त्या विभागातील पावसाचे अंदाज सांगावेत म्हणजे शेतीची कामे करणे सोयीस्कर ठरेल, ही मागणी जुनी आहे. त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले जाते तेव्हा त्या विभागांतील सर्वच जिल्ह्यांतून सम प्रमाणात पाऊस पडतो असे नाही.

वर्ध्यात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा नागपुरातील शेतकरी पावसाची वाट पाहत असतो. तुरळक सरी पडतील असा अंदाज वर्तविण्यात येतो तेव्हा हमखास मुसळधार पाऊस कुठेतरी पडत असतो. त्यामुळे शेतकर्‍याला शेतीकामाचे नियोजन करताना नाकी नऊ येतात. यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. शेतकरी वेळप्रसंगी कर्ज काढून शेतीची कामे उरकतो तो पावसाच्या भरवशावरच! शेती वाचवायची असेल तर अचूक हवामानाचा अंदाज काही तास अगोदर दिला गेला पाहिजे, तसेच तो मोघम नसावा. सरसकट हवामानाचा अंदाज शेतकर्‍याच्या फायद्याचा नाही, हे आता तरी लक्षात घेतले गेले पाहिजे. पावसाचा हंगाम सरल्यानंतरही अवकाळी बरसण्याचे प्रमाण वाढीला लागले आहे. यात नगदी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. नुकसानीनंतर शेतकर्‍याला मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असल्यामुळे तो कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतो आणि त्यातच आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत.

ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने किंवा स्कायमेटने यंदाचे मान्सून भाकीत सांगितले ते खरे ठरले तर ती दिलासादायक बाब ठरेल. अगोदरच महागाईने उच्चांक गाठला असून त्यात दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती परवडणारी नसेल. पावसाचे वाढलेले प्रमाण किंवा त्यातील अनियमितपणा लक्षात घेतला तर पर्यावरणाकडे लक्ष द्यावे लागेल. वृक्षतोड, सिमेंटची जंगले यामुळे निर्माण होणारी उष्णता भाजून काढणारी ठरत आहे. यामुळे पाण्याच्या पातळीतही झपाट्याने घट होत आहे. याकरिता समाधानकारक पाऊस होणे केव्हाही हिताचे ठरणार आहे. त्याची प्रतीक्षा शेतकरी वर्ग आणि इतर लोक करत आहेत. कारण जल हेच जीवन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -