आजपासून राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट; आधीच हवालदिल झालेला शेतकरी चिंतेत

मागील काही दिवसांपासून राज्‍यातील वातावरणात अदला-बदल होत आहे. कुठे कुठे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय? जाणून घ्या.

Unseasonal-Rains
मागील काही दिवसांपासून राज्‍यातील वातावरणात अदला-बदल होत आहे. कुठे कुठे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय? जाणून घ्या.

महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या महिन्यांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडला. यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. अशात पिकांचं नुकसान झाल्यानं आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आणखी चिंतेत टाकणारी बातमी आली आहे.आजपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून राज्‍यातील वातावरणात अदला-बदल होत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात आजपासून ते ६ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भात देखील १४ ते १६ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रात तर पुन्हा गारपिटीसह पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे राज्यातील १३ हजार ७२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली होती. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.

उत्तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व गुजरात, ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्‍येही १५ ते १७ मार्च दरम्यान हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.