रविवार ठरला घातवार! रत्नागिरी जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) लांजा आणि राजापूरमधील (Rajapur) परिसरात मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) लांजा आणि राजापूरमधील (Rajapur) परिसरात मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.

ट्रक चालक (Truck Driver) विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे यांनी देखील जागीच प्राण गमावले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने मालवाहू ट्रक जात होता. यावेळी अंजणेरी घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ट्रक चालक विजय सावंत यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्याची धडक मालवणहून (Malvan) चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या कारला बसली.

कारमधील दोघांचा मृत्यू

या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरुन खाली कोसळली. या घटनेत कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर, दोन जण म्हणजेच समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. याशिवाय, मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली गावाजवळ २ ट्रकची समोरासमोर धडक झाली.

रविवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


हेही वाचा – चारधाम तीर्थयात्रेस जाणारी बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू