घरआतल्या बातम्याMaratha Reservation : हॉटेलात काम, आंदोलनासाठी विकली शेती; असे आहे मनोज...

Maratha Reservation : हॉटेलात काम, आंदोलनासाठी विकली शेती; असे आहे मनोज जरांगे पाटील

Subscribe

जालना – गेल्या आठ-दहा वर्षांपासून ऐरणीवर आलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, ‘एक मराठा – लाख मराठा’ ही घोषणा आणि लाखा-लाखांच्या मूक मोर्चाने देशात चर्चिला गेला. या आंदोलनात आतापर्यंत 41 जणांनी बलीदान दिलं आहे. मात्र तरीही शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन सुरु राहिले. अपवाद ठरलं ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातील आमरण उपोषण. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर झालेला लाठीचार्ज आणि गोळीबाराने जालना जिल्ह्यातील हे छोटेशे गाव देशाच्या नकाशावर आले ते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे.

मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील मातोरे गावचा एक तरुण आहे. घरची परिस्थिती अगदी बेताची. मनोज जरांगे याचे शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे. लग्नानंतर सासरवाडीत म्हणजेच जालना जिल्ह्यातील अंबड येथे ते स्थायिक झाले होते. सासरवाडीत स्थायिक झाल्यानंतर पोटापाण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. मनोज यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आई-वडील आहेत. मातोरी गावात शेतजमीन कमी असल्यामुळे मनोज जरांगे त्यांच्या सासरवाडीत, समर्थ कारखाना परिसरात वास्तव्यास आले.

- Advertisement -

सामाजिक कामातून राजकीय पक्षाकडे वाटचाल
मनोज जरांगे पाटील यांना सामाजिक कामाची आवड असल्यामुळे त्यांनी राजकारणात वाट चोखळण्याचा निर्णय घेतला. जालना जिल्ह्यात काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. मनोज जरांगे यांचा कामाचा धडाका पाहून त्यांना काँग्रेसमध्ये जालना जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपद मिळालं. जेम्स लेन प्रकरणात काँग्रेसने घेतलेली भूमिका मान्य नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
2011 मध्ये त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. संघटनेमार्फत महानाट्याचे आयोजन केले. याच काळात त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे काढायला सुरुवात केली.
2012-13 मध्ये जायकवाडीच्या डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे यासाठी आंदोलन केलं.
2014 मध्ये औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. या मोर्चाने मनोज जरांगे पाटील यांची ओळखच मराठा समाजासाठी आंदोलन, मोर्चे काढणारा तरुण अशी झाली.
2016 मध्ये बीडच्या नगद नारायण गडावर 500 फुटांच्या भगव्या ध्वजाची उभारणी केली. यासाठी वेगवेगळ्या मठाधिपतींना निमंत्रित केले होते.
2016 मध्ये नगर जिल्ह्यात कोपर्डी प्रकरण झाले. या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली. या प्रकरणातील आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना मारहाण करण्यात आली होती. ती मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा आरोप करण्यात आला. यात बाबूराव वालेकर, राजेंद्र जर्हाड, अमोल कोल्हे, गणेश कोल्हे या चार जणांना अटकही करण्यात आली आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षाही झाली होती.

- Advertisement -
मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली
मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली

मराठा क्रांती मोर्चासाठी काम 
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चावेळी मराठवाड्यातील गावागावातून कार्यकर्त्यांना घेऊन जाणे. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकांना उपस्थित राहून या प्रश्नावर वारंवार आंदोलन करणे हे काम मनोज जरांगे यांचे सुरु होते. काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अबंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी चार एकर शेती खरेदी केली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी त्यांनी आपली दोन एकर जमीन विकल्याचेही सांगितले जाते.
राज्यात सत्ताबदल झाला त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन काही काळ सुस्त झालं होतं तेव्हाही मनोज जरांगे पाटील आपल्या पातळीवर आंदोलन करत होते. शासनस्तरारवर समित्या, अहवाल, कोर्टाचा निकाल यात आरक्षणाचा प्रश्न अडकला होता. मात्र मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलन सोडले नाही. 2021 मध्ये साष्टपिंपळगाव येथे जवळपास तीन महिने त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनानंतर वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्या, तेव्हा त्यांनी आंदोलन मागे घेतलं.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची त्यांची पद्धत त्यांनी अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणापर्यंत कायम ठेवली आहे. मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत अनेक आंदोलनात ते प्रामुख्याने सहभागी झाले आहेत.
मनोज जरांगे यांचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी असेल नाही तर मराठ्यांसाठी, प्रत्येक आंदोलनावेली त्यांच्यामागे लोकांची ताकद उभी राहू लागली होती.

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे
मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी केला मनोज जरांगेंचा भ्रमनिरास 
जानेवारी 2023 मध्ये मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी स्वतः संवाद साधला. मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या जातील असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये मनोज जरांगे यांनी अंबडमध्ये आंदोलनाची हाक दिली. अंबड तालुक्यातील पैठण फाटा येथे मराठा जन आक्रोश मोर्चा काढला. या आंदोलनात अनेक मराठा बांधव सहभागी झाले. मात्र या आंदोलनांची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाचे दुसऱे अस्त्र उपसले म्हणजे आमरण उपोषण सुरु केले. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. पंचक्रोशीतून लोक आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी येऊ लागले.

मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली
मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली

अंतरवाली सराटी देशाच्या नकाशावर आले
1 सप्टेंबरला मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याची माहिती पोलिसांनी गावकऱ्यांना दिली. त्यासाठी त्यांनी आंदोलकांशीही चर्चा केली. त्यावेळी आम्ही खासगी डॉक्टरांकडून मनोज जरांगे आणि आंदोलकांची तपासणी करुन घेऊ असे सांगण्यात आले. तेवढ्यात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. ही झटापट कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.  मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची बैठक संपल्यांनंतर पोलिस आणि आंदोलकांच्या धुमश्चक्रीचे व्हिडिओ समोर येऊ लागले. मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं. मराठा समाजातील लोक रस्त्यावर येऊ लागले. सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु झाली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले. तर काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली.

शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगेची भेट घेतली. सरकारकडून नितेश राणे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर यांनीही मनोज जरांगेंची भेट घेतली. शासनाकडून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महत्त्वाच्या मंत्र्यांची मुंबईत सह्याद्री अतिथीग्रहात बैठक झाली.
मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. थंड झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील आता चेहरा झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -