घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर"काळजी करू नका...", मनोज जरांगे लागले कामाला; पुन्हा राज्यव्यापी दौरा होणार

“काळजी करू नका…”, मनोज जरांगे लागले कामाला; पुन्हा राज्यव्यापी दौरा होणार

Subscribe

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्यातील दौऱ्याची घोषणा केली आहे. 24 डिसेंबरच्या आधी राज्यातील मराठा बांधवांना भेटून ते त्यांच्याशी संवाद साधणार आहे. या दौऱ्याची संपूर्ण माहिती आज किंवा उद्यापर्यंत घोषित करण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर : “मी ठणठणीत आहे, काळजी करू नका. डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार करून मला बरे केले आहे,” असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारले होते. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावलेली पाहायला मिळाली. ज्यानंतर गुरुवारी (ता. 02 नोव्हेंबर) सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची आरक्षणासंदर्भात समजूत काढली. यावेळी निवृत्त न्यायाधीश गायकवाड आणि निवृत्त न्यायाधीश शुक्रे यांनी जरांगे यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. ज्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळासमोर जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – मुख्यमंत्री होण्याबाबत अजित पवारांच्या आईने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांची रुग्णालयात भेट त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. यानंतर आज (ता. 05 नोव्हेंबर) मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. तर यापुढील प्लॅन काय असणार आहे, याबाबतची माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सर्व महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो की, सध्या तब्येत चांगली आहे. आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. त्यामुळे 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Manoj Jarange Patil will tour the state again)

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्यातील दौऱ्याची घोषणा केली आहे. 24 डिसेंबरच्या आधी राज्यातील मराठा बांधवांना भेटून ते त्यांच्याशी संवाद साधणार आहे. या दौऱ्याची संपूर्ण माहिती आज किंवा उद्यापर्यंत घोषित करण्यात येईल. परंतु, आता मागे हटायचे नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार आहे. आंतरवाली सराटी गावात आणि अन्य गावांत साखळी उपोषण सुरू आहे. पुढे ही असेच सुरू राहणार असल्याचे जरांगे पाटील यांच्याकडून प्रसार माध्यमांच्या समोर सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल, असे काही करू नका. कोणी आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावे लागणार आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झाला आहे. हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले नाही. आम्हाला शेती पाहायची आहे आणि मुलांसाठी काम करायचे आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ भेट घेण्यासाठी सोमवारी येणार आहे. त्यावेळी वेळेचा मुद्दा निकाली लागणार आहे. राज्यात प्रथमच एकाच वेळी तीन समित्या काम करत आहे. मागावर्गीय आयोग, शिंदे समिती आणि न्यायमूर्तींची समिती काम करत आहे. यामुळे आता पूर्ण आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ आला आहे. सरकार आता जोरात कामाला लागले आहे. मी माझा महाराष्ट्रातील मराठा समाजाविषयी असलेला प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. त्यामुळे सरकारच्या समित्यांना संपूर्ण राज्यात काम करायला भाग पाडले आहे. सरकारने सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कामाला लावले आहे, अशी माहिती जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -