घरताज्या घडामोडीमुंबईतील घाटकोपर–मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरील सामग्रीची चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईतील घाटकोपर–मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरील सामग्रीची चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई महापालिकेने वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बांधलेल्या घाटकोपर–मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरील काही महत्वाच्या लोखंडी साहित्य सामग्रीची अज्ञात चोरांकडून वारंवार चोरी केली जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सदर चोरी प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या उड्डाणपुलावरील वाहनांची वर्दळ आणि सुट्या भागांची होत असलेली चोरी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबई पोलिस वाहतूक शाखेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीडोमीटर लावण्याची विनंती महानगरपालिका प्रशासनाने या पत्रांद्वारे पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील नवीन उड्डाणपुल बांधल्यापासून काही ना काही वादग्रस्त घटना घडून हा पूल सतत चर्चेत राहिला आहे. ज्या वेळी हा पूल उभारला त्यावेळी त्याच्या नामकरणावरून भाजप व शिवसेना यांच्यात वादविवाद झाले. नंतर ह्या नवीन पुलावर वाहन अपघात होण्याच्या घटना प्रकरणात वाढ झाली. त्यामुळे हा पूल चर्चेत राहिला. आता काही भुरट्या चोरांच्या टोळीकडून या पुलावर लावण्यात आलेल्या लोखंडी साहित्य सामग्रीची वारंवार चोरी केली जात असल्याची बाब समोर आली आहे.

- Advertisement -

या पुलावर, दुभाजकाचे स्टड पोस्ट आणि इतर सुट्या भागांची वारंवार चोरी होत आहे. त्यासंदर्भात अखेर महापालिका प्रशासनाने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सुमारे १ लाख ८३ हजार रुपये किमतींच्या लोखंडी साहित्य सामग्रीची चोरी झाली आहे. त्याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात महापालिकेतर्फे सहायक अभियंता (पूल) ज्ञानेश्वर दगडू उकिर्डे यांनी देवनार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण गेल्या १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले आणि हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

- Advertisement -

पुलावरील साहित्य सामग्रीच्या चोरीबाबत माहिती

सप्टेंबर २०२१ पासून ते ८ फेब्रुवारी २०२२ या ६ महिन्याच्या कालावधीत या पुलावरील लोखंडी दुभाजकाचे जवळपास २०० स्टड पोस्ट आतापर्यंत चोरीस गेले आहेत. प्रत्येक स्टड पोस्ट हे अडीच फूट उंचीचे आहेत. त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. यासोबत १२ इंच जाडीचे लोखंडी क्रॅश बॅरीअर (किंमत ३० हजार रुपये), १२ मीटर लांब आणि १० इंच रुंदीचे लोखंडी हाईट बॅरीअर (किंमत ३० हजार रुपये), सुमारे ३०० नग लोखंडी नटबोल्ट (किंमत ३ हजार रुपये) इत्यादी विविध सुटे भागदेखील चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.


हेही वाचा : Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना ‘Endemic’ टप्प्यात, २४ तासांत ४२९ नव्या रूग्णांची नोंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -