Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र म्हाडा ऑनलाईन भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

म्हाडा ऑनलाईन भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

डमी उमेदवारासह इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वापरल्याचे तपासात उघडकीस

म्हाडा ऑनलाईन भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ६० उमेदवारांविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या ६० पैकी ३९ उमेदवारांनी बोगस उमेदवार म्हणून परीक्षा दिली, तर २१ उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा गैरवापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या सर्व उमेदवारांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. म्हाडाच्या विविध ५६५ पदांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर टीसीएच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात ही परीक्षा विविध १०६ केंद्रांवर घेण्यात आली होती, मात्र या परीक्षेच्या निकालावेळी निवड यादीत ६३ संशयित उमेदवार आढळले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची म्हाडाने टीसीएसला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर टीसीएसने चौकशी सुरू केली होती. हा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचा अंतिम रिपोर्ट म्हाडाला सादर केला होता. त्यात काही परीक्षा केंद्रांतील उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या होत्या. याच रिपोर्टमध्ये ६० उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत ३९ उमेदवार डमी होते. ते उमेदवार दुसर्‍यांची परीक्षा देण्यासाठी तिथे आले होते.

- Advertisement -

तसेच २१ उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा परीक्षेदम्यान गैरवापर केला होता. त्यामुळे म्हाडाचे प्रशासकीय अधिकारी आशिष वैद्य यांनी खैरवाडी पोलिसांत संंबंधित ६० उमेदवारांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सुरुवातीला ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. याच परीक्षेत संबंधित उमेदवार संशयित आढळून आले होते. त्यातील एका महिलेने तिच्या फोटोऐवजी आधारकार्ड अपलोड केले होते.

उर्वरित उमेदवारांनी त्यांच्या जागी ३९ बोगस उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी पाठविले होते. काही उमेदवारांनी पहिल्या तासाला ३० ते ५०, तर दुसर्‍या तासाला १०० ते १५० प्रश्न सोडविले होते. हे उमेदवार परीक्षा सुरू असताना अनेकदा जागेवरून उठून गेले होते. आतापर्यंत याच प्रकरणात ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात मुंबईतील पवई, बीडच्या शिवाजीनगर, अमरावतीच्या सातारा बडनेरा, नागपूरच्या एमआयडीसी, नाशिकच्या नांदगाव पेठ आदी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -