सदोष मका बियाण्यांमुळे लाखोंचे नुकसान

गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कंपनीच्या बियाण्यांमध्ये दोष निघत असून, चांगली वल राहिली तरी बियाणे उगवत नाही. काही वेळेस उगवल्यावरती पिकाची वाढ होते किंवा मरतात अशा अनेक बाबी निर्माण होतात. मग संबंधित विभाग बियाणे खराब असल्यावर सुद्धा बघ्याची भूमिका का घेतो? असा सवाल दरवर्षी शेतकर्‍यांना पडतो.

सटाणा : वटार येथील चार ते पाच शेतकर्‍यांनी एका नामांकित मका कंपनीचे बियाणे आपल्या शेतात पेरणी केले होते. पेरणी केल्यानंतर हे बियाणे सदोष असल्याने उगवनीनंतर एक महिना उलटला तरी संपूर्ण पीक लाल पडले असून संपूर्ण क्षेत्रात मर होत आहे. सदोष मका बियाण्यामुळे या शेतकर्‍यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकर्‍याने संपूर्ण मका पिकावर रोटर फिरवला आहे. संपूर्ण खरीप हंगामच वाया गेल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

सिझनटा या कंपनीचे ६६६८ या मका वाणाची बॅगेची पेरणी केली होती. पेरणीनंतर हा मका वाण कमी प्रमाणात उगवण झाल्यानंतर संपूर्ण लाल पडला असून संपूर्ण पिकाची मर होत असल्याने संबंधित शेतकर्‍यांचे लक्षात आले. त्यांनी याबाबत संबंधित दुकानदारला भ्रमणध्वनीवर माहिती दिली, पण संबंधित या कंपनीतील वरिष्ठांकडून शेतकर्‍यांनाच खडे बोल सुनावण्यात आले. सदोष बियाण्यामुळे आपली फसवणूक झाली असताना कंपनी प्रशासनाकडून अजून आपल्यालाच खड्डे बोल सुनावण्यात येत असल्याने संबंधित शेतकर्‍यानी न्याय मागायचा तरी कोणाकडे? अशा परिस्थितीत शेवटी नैराश्यातून मका फिकावर रोटर फिरवला.

सदर नुकसानीबाबत कृषी विभागाकडे आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. आतापर्यंत १३ तक्रारी प्राप्त झालेल्या असून त्या तक्रारींचा रितसर शेतात जाऊन पंचनामा केला असून, सदर तक्रारी ह्या आता ग्राहकमंचाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. : कृषी अधिकारी, पंचायत समिती, सटाणा