घरमहाराष्ट्रमित्र ते फडतूस... एकनाथ शिंदेंना बगल देऊन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांबरोबर भाजपावर निशाणा!

मित्र ते फडतूस… एकनाथ शिंदेंना बगल देऊन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांबरोबर भाजपावर निशाणा!

Subscribe

मुंबई : राज्यातील राजकारण कायम नाट्यमय वळणे घेत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजपा असे राजकारण रंगत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या झालेल्या वज्रमुठ सभेनंतर हे चित्र अधिक स्पष्ट झाले.

राज्यामध्ये 2014च्या निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र सत्तेत आले. सत्तेत राहूनही शिवसेनेची भूमिका त्यावेळी विरोधी पक्ष असल्याप्रमाणेच असायची. मात्र कितीही ताणून धरले तरी, तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मैत्री अबाधित होती. 2019च्या ऐतिहासिक सत्तास्थापनेनंतरही ती मैत्री टिकून होती. डिसेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना दस्तुरखुद्द तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा ‘मित्र’ असा उल्लेख केला होता.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे होतात न होतात तोच तत्कालीन बांधकाममंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आणि त्या झेंड्याखाली शिवसेनेचे अन्य 39 आमदार जमा झाले. या बंडामागे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अशी कबुली विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतच दिली आहे. तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांच्या रडारवर केवळ शिंदे गटच होता. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गट यांच्यात कायम कलगीतुरा रंगत होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या राजकीय शिमग्याला वेगळाच रंग येऊ लागला आहे. विशेषत:, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेनंतर राज्यातील भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा रोख दिसू लागला आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले होते. पण उद्धव ठाकरे यांच्याकरिता ठेवलेली वेगळी खुर्ची, ते व्यासपीठावर प्रवेश करताच झालेला जल्लोष आणि आतषबाजी लक्षात घेता, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि नेतृत्व हे उद्धव ठाकरेच आहेत, हे अधोरेखित झाले.

- Advertisement -

या सभेनंतरच ठाकरे गटाची रणनीती स्पष्ट झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकाच्या अग्रलेखातूनही भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर शरसंधान करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाण्यात मारहाण झाली. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी फडणवीस हे ‘फडतूस गृहमंत्री’ असल्याची टीका केली. त्यावर अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या विविध नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या.

उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सर्व काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले होते. त्या अनुषंगाने शिंदे गटाऐवजी आता महाविकास आघाडीच्या निशाण्यावर भाजपाच असण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका करत राहणे हे स्वाभाविक समजेल जाईल. तसेच या दोन गटांत सुरू असलेल्या संघर्षाचा फायदा भाजपाला होऊ शकतो. त्यामुळेच भाजपाला लक्ष्य करण्याचे मविआचे उद्दीष्ट असावे आणि उद्धव ठाकरे यांची वक्तव्ये ही त्याचीच नांदी असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -