मनसे-भाजप एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नांदगावकर म्हणतात….

MNs bala nandgaonkar reaction on meeting with devendra fadnavis
मनसे-भाजप एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नांदगावकर म्हणतात....

मनसे आणि भाजपमध्ये युती होणार अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरु आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या पोटनिवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यात भाजप- मनसेची युती झाली आहे. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप-मनसे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु आहे. यामध्येच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ही वैयक्तिक कामांसाठी भेट घेतली असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली आहे. राजकीय नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं सूचक विधानही बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. नांदगावकर आणि फडणवीस यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना वैयक्तिक कामसाठी भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. फडणवीसांकडे काहीही कारण नव्हते परंतु वैयक्तिक महत्त्वाच्या कामासाठी फडणवीसांची भेट घेतली असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले आहे. तसेच राजकीय विषयावर चर्चा झाली का असे विचारले असता दोन राजकीय नेते भटले की चर्चा होतेच असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. आमच्या भेटीवर काय अर्थ लावायचा तो लावा परंतु मी वैयक्तिक कामासाठी भेट घेतली असेही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडे उत्तर द्यायला सक्षम

बाळा नांदगावकर यांना समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याबद्दल प्रश्न केला असता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना दीर्घकाळापासून ओळखतो ते उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचे नांदगावकर यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे शासकीय अधिकारी असून ते त्यांची ड्यूटी चोख बजावत असतील अशी खात्री आहे. त्यांच्याविरोधात जे काही आरोप करण्यात येतील त्यांचे उत्तर देण्यासही ते सक्षम आहेत असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

भांडूपमध्ये मनसेचा मेळावा

मनसेचा मेळावा भांडूपमध्ये आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष उपस्थित राहतील असे नांदगावकर यांनी सांगितले आहे. भांडूपच्या मेळाव्यानंतर पुणे जिल्ह्यातही दसरा मेळावा घेण्यात येईल अशी माहिती नांदगावकर यांनी दिली आहे.


हेही वाचा :  पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे देशात कोळशाचा तुटवडा, नवाब मलिकांचा भाजपवर घणाघात