Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मोदी सरकारच्या यु-टर्नचा वाचला पाढा, खासदार सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांवर पलटवार

मोदी सरकारच्या यु-टर्नचा वाचला पाढा, खासदार सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांवर पलटवार

भाजपने जीएसटी, मनरेगा आणि आधार युआयडी सारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच या योजना राबविल्या होत्या. हा यु-टर्न नव्हता का?

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना शरद पवार यांचा नामोल्लेख करत नव्या कृषीकायद्यांच्या धोरणांना पवार यांचा सुरुवातीला पाठिंबा होता असे सांगितले. त्यावर बोलताना आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारला जशास तसे उत्तर देत मोदी सरकारच्या यु-टर्नचा पाढाच वाचला. भाजपने जीएसटी, मनरेगा आणि आधार युआयडी सारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच या योजना राबविल्या होत्या. हा यु-टर्न नव्हता का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा काही भाग वाचून दाखविला होता. त्यावर बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मी पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना या मुद्यावर प्रतिवाद करु शकले असते. पण आमची ती संस्कृती नाही. त्यामुळे मी आता त्याला उत्तर देत आहे असे स्पष्ट केले.

शरद पवार यांनी जे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्यात त्यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करुनच राज्यांनी त्यावर विचार करावा’, असे म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटी करप्रणालीला विरोध केला होता. आम्ही म्हणजे युपीआयने आरटीआय, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा हक्क, नरेगा, नवीन कॉर्पोरेट कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणला होता. विकासाच्या कोणत्याही कायद्याला युपीएने एकतर्फी न आणता सर्वांशी चर्चा करुन विकासाचे कायदे आणले. भाजपने सुरुवातीला या कायद्यांना विरोध करुन सत्तेत आल्यानंतर याच कायद्यांची अंमलबजावणी केली असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

नरेगाचा विरोध भाजपने सातत्याने केला. मात्र याच नरेगामुळे कोविड काळात अनेकांना रोजगार मिळाला, हे विसरु शकणार नाही. आधारकार्डला देखील भाजपने टोकाचा विरोध केला. मात्र आज आधारला पुढे घेऊन जाण्याचे काम मोदी सरकार करत आहे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मोदी सरकारचा हा लेफ्ट टर्न, राईट टर्न आहे की यु-टर्न हे मला माहीत नाही. पण पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने आमच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभत नाही अशी जोरदार टीकाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

शरद पवार यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर ते १० वर्ष कृषीमंत्री असताना कोणतेही आंदोलन का झाले नाही? त्या पत्राचा त्यावेळी विरोध का झाला नाही? मी इथे शरद पवारांच्या भूमिकेवर बोलत नाही. त्यासाठी ते सक्षम आहेत. मात्र त्यावेळी सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांनी चर्चेस सुरुवात केली होती, म्हणून त्यांना विरोध झाला नाही, असे ठामपणे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – भारताच्या वाट्याची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

 

 

 

- Advertisement -