घरमहाराष्ट्रभंडारा-गोंदियात शेतकरी ठरवणार खासदार

भंडारा-गोंदियात शेतकरी ठरवणार खासदार

Subscribe

भंडारा-गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ २००८साली अस्तित्वात आला. त्यानंतर या ठिकाणी तीन वेळा निवडणूक झाली, ज्यात दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाला. यंदा या ठिकाणचे नाना पटोले हे स्थानिक नेते नागपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नाना पटोले यांची ताकद नागपूरच्या दिशेने वळाल्याने या ठिकाणी नाना पटोले भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या वाट्यात फारसे मिळत नाही. तरीदेखील नाना पंचबुद्धे यांच्यासाठी राष्ट्र्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मात्र दारोदार जाऊन प्रचार करत आहेत. प्रफुल्ल पटेल हेदेखील शरद पवार यांच्याप्रमाणे यावेळी निवडणूक राजकारणातून बाहेर आहेत. आता ते मोकळेपणाने पंचबुद्धे यांचा प्रचार करत आहेत. दुसरीकडे भाजपनेे सुनील मेंढे यांच्यामागे सर्व ताकद उभी केली आहे. यावेळी आव्हान मोठे नसल्याने भाजपची आशा वाढली आहे. असे असले तरी या भागातील निर्णायक मते ही शेतकर्‍यांची आहेत आणि येथील शेतकरी अनेक समस्यांनी पिचलेला आहे. या शेतकर्‍यांची मतेच इथला खासदार ठरवणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदियामधून भाजपने नाना पटोले यांना उमेदवारी दिली होती, त्यात पटोले निवडून आले. त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे ताकदवान नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मोदी लाटेचा पटोले यांना लाभ झाला होता. मात्र पुढे पक्षनेतृत्त्वाबद्दल नाराजी व्यक्त करत पटोले पुन्हा काँग्रेसवासी झाले. त्यांनी २०१८मध्ये लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटेल यांचा पराभव करून विजय मिळवला होता. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा २००८ साली अस्तित्वात आला. भंडारा-गोंदिया लोकसभामध्ये तुमसर, भंडारा, साकोळी, अर्जुनी-मोरगाव, तिरोरा आणि गोंदिया हे सहा विधानसभा क्षेत्रे येतात. त्यातील गोंदियामध्ये काँग्रेस वगळता उर्वरित ५ विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपचा आमदार निवडून आला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात आहेत. ते भंडार्‍याचे नगराध्यक्ष तसेच व्यवसायाने बिल्डर आहेत. त्याचबरोबर संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे उभे आहेत. नाना पंचबुद्धे हे माजी आमदार आणि माजी शिक्षणमंत्री होते. त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे आणि या मतदारसंघात ‘हेेवीवेट’ समजल्या जाणार्‍या प्रफुल्ल पटेलांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. नानांना मत म्हणजेच मलाच मत असा प्रचार सध्या पटेल करत आहेत.

- Advertisement -

या मतदारसंघात बहुसंख्य शेतकरी हे धान उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अत्यंत कमी जमीन असते. एकदा का धान काढले की त्यांच्याकडे काम नसते. त्यांना मजुरी करून जगावे लागते. त्यामुळे गरिबी तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. जिल्ह्यात खाणी आहेत, पण या ठिकाणी असलेले मजूर हे बिहार किंवा इतर राज्यातले आहेत. उद्योगधंदे नाहीत. भंडार्‍यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. धरण बांधून तयार आहेत पण कालवे नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावतो. दुसरी गोष्ट म्हणजे 84 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून कायम आहे. त्यामुळे 84 गावातील शेतकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन ते निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सोपवले आहे.

ही जागा निघावी म्हणून भाजप आपली पूर्ण शक्तीपणाला लावत आहे. मेंढे हे नवखे उमेदवार आहेत त्यांच्या आयुष्यातील ही दुसरीच निवडणूक आहे. त्यांच्या पाठीमागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पाठीशी उभे राहतील. मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ भाजपकडे आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे. भंडारा शहराव्यतिरिक्त त्यांचा फार काही जनसंपर्क आहे, असे म्हणता येणार नाही. पण लोकसभेला मतदान हे पक्षानुसार होते. दुसर्‍या बाजूला नाना पंचबुद्धे आहेत. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासाठी अक्षरशः ‘डोअर टू डोअर’ प्रचार करत आहेत. म्हणून पंचबुद्धे विरुद्ध मेंढे ही लढत अटीतटीची होणार आहे.

- Advertisement -

2009मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल भंडारा-गोंदिया येथून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या मोदी लाटेत या ठिकाणी भाजपचे नाना पटोले विजयी झाले होते. २०१८ मध्ये या ठिकाणी पोट निवडणूक झाली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर कुडके विजयी झाले. २०१९मध्ये या ठिकाणी भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली आहे. तर बहुजन समाज पक्षाने डॉ. विजया नंदुरकर यांना उमेदवारी दिली आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -