खासदार संजय राऊतांचा २८ मे रोजी कोल्हापूर दौरा, जाहीर सभा घेणार

Sanjay Raut

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेकडून (Shivsena) पूर्णविराम मिळाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje) ऑफर देण्यात आली होती. परंतु संभाजीराजेंनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर (kolhapur) दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले होते.

शिवसेनेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. परंतु पवारांच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. अशातच संजय राऊत २८ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी राऊत यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापूरला जाणार आहेत.

४ दिवसांसाठी संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर

२७ मे पासून पुढील ४ दिवसांसाठी संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या चर्चांना शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. परंतु संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयावर सध्यातरी मौन बाळगल्यामुळे राऊत जाहीर सभेतून कोणती भूमिका मांडणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही, यावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र, आता संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. पण मी तुम्हाला माहिती देतो दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत. ते कडवट शिवसैनिक आहेत. ते एक मावळा आहेत. मावळे असतात म्हणून राजे असतात, असं संजय राऊत म्हणाले.

कोण आहेत संजय पवार?

संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोघे दोन वेळा निवडून आले आहेत. यामुळे पवारांना आमदार होता आले नाही. करवीर तालुका प्रमुख आणि चार वर्षे शहरप्रमुखपदी त्यांनी काम केले आहे.


हेही वाचा : कट्टर शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी, जाणून घेऊया संजय पवार यांचा राजकीय प्रवास