घरमहाराष्ट्रबारावी निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर

बारावी निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर

Subscribe

सीबीएसई प्रमाणे राज्य मंडळाचा 30:30:40 फॉर्म्यूला

बारावीच्या निकालाबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करत शुक्रवारी शालेय शिक्षण विभागाने बारावी निकालासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली. सीबीएसई मंडळाप्रमाणे राज्य मंडळाने 30:30:40 गुणांचा फॉर्म्यूला निश्चित केला आहे. बारावीच्या निकालासाठी दहावीच्या लेखी परीक्षेतील गुण, अकरावीची परीक्षा आणि बारावीमधील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे गुण विचारात घेण्यात येणार आहे. मात्र, बारावीमधील गुणांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल मान्य नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू झाल्यावर बारावीची परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. नुकताच सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केल्यानंतर राज्य मंडळ कशाप्रकारे निकाल जाहीर करणार याकडे राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले होते. शुक्रवारी शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या निकालाची मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली. यामध्ये दहावी व अकरावीचे मूल्यमापन हे कोविडचा प्रादुर्भावाच्या परिस्थितीपूर्वी करण्यात आलेले आहे. ही बाब लक्षात घेऊन दहावीमधील मूल्यमापन, अकरावी व बारावीमध्ये वर्षभरात कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दहावीमधील लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

- Advertisement -

दहावीतील निर्धारित गुणांपैकी 30 टक्के गुण संपादणूक असेल. अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय निकालातील 30 टक्के गुण संपादणूक आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण यानुसार 40 टक्के गुण लक्षात घेतले जाणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण विषयांचे 150 गुणांसाठी मूल्यमापन करण्यात येईल व त्याचे रुपांतर 100 पैकी गुणात करण्यात येईल. द्विलक्षी अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे 200 गुणांचा एक विषय व 100 गुणांचे चार विषय याप्रमाणे 600 गुणांसाठी मूल्यमापन केले जाणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) अंतर्गत विद्यार्थ्यांचे तीन विषयांच्या 200 गुणांचे रुपांतर प्रत्येकी 100 गुणात करून 600 गुणांच्या आधारे निकाल निश्चित केला जाणार आहे.

शाखा बदलणार्‍या विद्यार्थ्यांनाही दिलासा
राज्य मंडळाच्या व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबाबत अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर शाखा बदलून अन्य शाखेत इयत्ता बारावीसाठी प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यास अकरावी व बारावीतील समान विषयांची सरासरी विचारात घेऊन 100 पैकी गुण निश्चित करून ते उर्वरित विषयांना देण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना अन्य पर्याय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी कोविड -19 ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणार्‍या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणार्‍या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.

पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांसाठी अन्य फॉर्म्यूला
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मात्र शिक्षण विभागाने अन्य फॉर्म्यूल्याचा वापर केला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीतील परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण घेऊन त्याला 50 टक्क्यांमध्ये रुपांतर करण्यात येणार तर यापूर्वीच्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांच्या सरासरी गुण घेऊन त्याला 50 टक्क्यांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खासगीरित्या बसणार्‍या विद्यार्थ्यांचे दहावीतील परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण घेऊन त्याला 50 टक्क्यांमध्ये रुपांतर करण्यात येणार तर बारावीतील सराव चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प आणि तत्सम अंतर्गत मूल्यमापनातील विषयनिहाय गुणाचे 50 टक्क्यांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.

निकाल समितीची स्थापना
प्रत्येक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या स्तरावर मुख्याध्यापक यांच्यासह सात सदस्य असलेली समिती गठीत करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक समितीचे अध्यक्ष असतील तर उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सेवाज्येष्ठ शिक्षक समितीचे सचिव असतील.

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन होणार नाही
बारावी परीक्षेचा निकाल विविध मुल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येत आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा आणि अन्य मूल्यमापन परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन ही सुविधा या परीक्षेसाठी उपलब्ध नसणार.

काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार जाहीर होणार्‍या निकालाबाबत काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काहींमध्ये नाराजीचा सूर आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांना दहावीत कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षांत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन हे दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या गुणवत्तेवर ठरणार असल्याने विद्यार्थ्यांनी बारावीत कमी गुण मिळणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -