घरCORONA UPDATECorona: वर्दीच्या मदतीला वर्दीच! एसटी चालक पोलिसांसाठी उतरला मैदानात!

Corona: वर्दीच्या मदतीला वर्दीच! एसटी चालक पोलिसांसाठी उतरला मैदानात!

Subscribe

रात्रपाळीत पोलिसांबरोबर एसटीचा चालक करतो पेट्रोलिंग!

कोरोना हे जागतिक संकट देशासमोर उभे आहे. या संकटात दोन हात करण्यासाठी रात्रं-दिवस पोलीस कार्यरत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची क्षमता कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण देखील वाढलेला आहे. हा ताण कमी करण्यासाठी चक्क एसटी महामंडळाचा चालक खाकी वर्दीच्या मदतीसाठी धावून गेला आहे. किरण धनगर (चालक क्रमांक 8738) असं या एसटी चालकांचे नावं असून लॉकडाऊन काळात विनामोबदला अमळनेर पोलिसांच्या वाहनावर सेवा देत आहे. त्यांच्या या कार्यामुळे एसटी महामंडळात वर्दीच्या मदतीला वर्दीच धावून आल्याची चर्चा होत आहे.

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील एसटीच्या बसेस धावत आहेत. मात्र ग्रामीण भागातील एसटी बंद असल्यामुळे एसटीचे चालक वाहक आणि इतर कर्मचारी घरीच बसून आहेत. कोरोना हे जागतिक संकट समोर उभे असताना या संकटावर मात करण्यासाठी कमी मनुष्यबळात सुद्धा पोलीस कर्मचारी, डॉक्टर, आणि स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या प्राणांची बाजी लावत अहोरात्र काम करत आहे. या संकटकाळात देशासाठी आपलेही काही योगदान असलं पाहिजे या हेतूने जळगाव जिल्ह्यातील एसटीच्या अमळनेर आगारातील एसटी चालक किरण धनगर पुढे सरसावला आहे.

कोरोनाच्या या  संकटासमोर मला देशसेवा करण्याची संधी हवी होती. त्यासाठी मी रितसर सर्वांना निवेदन सुद्धा केले होते. यांची दखल घेत पोलिसांनी मला संधी दिली. मी एसटी महामंडळात चालक आहे. त्यामुळे मला अमळनेर पोलीस  निरीक्षक अंबादास मोरे यांनी पेट्रोलिंग वाहन चालविण्याचे काम दिले. पोलिसांनी दिलेल्या संधीबद्दल मी आभार मानतो.

– किरण धनगर, एसटी चालक, अमळनेर आगर

- Advertisement -

पोलिसांनी दिली संधी

देशावर आलेले संकट पाहता किरण यांनी कोणत्याही शासकीय वाहनावर चालक म्हणून देशसेवा करण्याची संधी मिळावी अशी मागणी केली होती. ही मागणी अमळनेरच्या तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्रांत अधिकारी आणि एसटीच्या आगार व्यवस्थापकाकडे केली होती. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून काम करण्याची संधी दिली आहे.

- Advertisement -

देशसेवेची संधी मिळावी म्हणून केली होती मागणी

लॉकडाऊनमुळे किरण घरी राहत होते. त्यामुळे घरी राहण्यापेक्षा देशसेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी ही मागणी केली होती. अमळनेर पोलिसांनी त्यांना संधी दिल्यानंतर ते आता पोलिस वाहनावर चालक म्हणून सेवा देत आहे. दररोज रात्री १० ते सकाळी १० वाजेपर्यत गावागावात गस्त घालणाऱ्या पथकाला इच्छित स्थळी ते पोहोचवण्याचे काम करतात, अशी माहिती किरण धनगर यांनी दैनिक आपलं महानगरला दिली.

किरणवर कौतुकाचा वर्षाव

जिवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता विना मोबदला सेवा देत असलेल्या किरण धनगर यांचे महामंडळात सर्वत्र कौतुक होत आहेत. संधी दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचे किरण धनगर यांनी आभार मानले आहेत. एसटी कामगार सर्व संघटनांनी सुद्धा किरण यांच्या या कार्याचे कौतुक करत आहे.


LockDown: अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी लालपरी थेट त्यांच्या गावात
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -