घरताज्या घडामोडीनाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

Subscribe

महाराष्ट्रातील काँग्रेसला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादामध्ये लक्ष घातले आहे. राज्यात काँग्रेसला प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक चेहरा हवा आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक असलेले नाना पटोले यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या स्थितीबाबत काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी हे फारसे समाधानी नाहीत. मुळातच शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील होण्यास राहुल गांधी यांचा सुरुवातीपासूनच ठाम विरोध होता. मात्र तरीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहामुळे आणि महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राहुल गांधी यांनी शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास काहीशी नाराजीनेच संमती दिली होती.

बाळासाहेब थोरातांबद्दल नाराजी?

काँग्रेस जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी असली तरी राज्य सरकारच्या महत्त्वाच्या मोठ्या निर्णयांमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही, अशी उघड नाराजी काल राहुल गांधी यांनी दिल्लीत व्यक्त केली होती. पक्षीय बलानुसार महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला तिसर्‍या क्रमांकाचे स्थान आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री अधिक सक्रिय असतात. मोठे आणि महत्त्वाचे निर्णय हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच चर्चा होऊन घेतले जातात, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यातही काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघाही माजी मुख्यमंत्र्यांमधून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे तर प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची वाटचाल आणखी तिसर्‍या दिशेने चालू असते अशी नाराजीही ही राज्यातील थोरात विरोधी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचवली आहे.

- Advertisement -

काँग्रेसला हवाय आक्रमक प्रदेशाध्यक्ष!

या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जर काँग्रेस पक्षाला पुन्हा उर्जितावस्था आणायची असेल आणि आणि तळागळातील काँग्रेस कार्यकर्त्याला सक्षम बनवायचे असेल तर बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा आक्रमक आणि तरुण नेतृत्वाला संधी दिली गेली पाहिजे, असा सूर राज्यातील काँग्रेस नेत्यांमधून व्यक्त होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसमधील अत्यंत जहाल आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. राज्यात भाजपसारख्या सक्षम पक्षाला रोखायचे असेल तर नाना पटोले यांच्यासारखा आक्रमक आणि तरुण चेहरा पुढे आला पाहिजे असा सूर दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार नसल्याने काहीसे विजनवासात गेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या अभ्यासू आणि अनुभवी नेत्याचा महाराष्ट्रात वापर करून घेण्यासाठी त्यांच्याकडे अधिक सक्षम जबाबदारी दिली गेली पाहिजे, असे मत काँग्रेस हायकमांडचे आहे. त्यातूनच पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये विचार सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून नाना पटोले यांची निवड होऊ शकेल तर पृथ्वीराज चव्हाण यांचा संसदीय कार्यप्रणालीतील अनुभव, अभ्यास लक्षात घेऊन त्यांची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदाकरता होऊ शकेल अशा दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

आक्रमक नाना पटोले!

नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. ते राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. २०१४ ते २०१७ या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असे सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता. २०१७ मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ते काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले. नाना पटोले यांनी २०१९ मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. पटोले आक्रमक असले तरी ‘ही आक्रमकता योग्य ठिकाणी वापरु’, अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारीच्या घोषणेनंतर दिली होती.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -