नाशिक ‘रेड अलर्ट’ झोनमध्ये; जाणून घ्या एकूण परिस्थिती

नाशिक : शहरासह जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून धुवाँधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर, अनेक भागांतील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला. पुराचे पारंपरिक मापक असलेला दुतोंड्या मारूतीच्या गळ्यापर्यंत पाणी आले होते. त्यातच आता १४ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कायम असून, आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणसाठ्यांतही वाढ होत असल्याने सावधगिरी म्हणून गंगापूर धरणातून १० हजार क्युसेक वेगाने विसर्गही सुरू आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, उत्तर पश्चिम पट्ट्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच, गंगापूरमधून विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक इ. परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, निफाड, देवळा, चांदवड, मालेगाव, सिन्नर या तालुक्यांना ऑरेंज अलर्ट, तर येवला, नांदगावला 11 ते 15 जुलैदरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यातील घाट भागात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगररांगांमध्ये असणार्‍या गावांनीही सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गोदावरी नदीपात्रासह नांदूरमध्यमेश्वर धरणात मोठ्या पाण्याची आवक होत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व आठ दरवाजे उघडण्यात येवून या दरवाजांतून ६३ हजार ९६६ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमधून नगर, औरंगाबादकडे पाणी वेगाने पुढे गेले. या पाण्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. पुराच्या पाण्याखाली रस्ते आणि छोटे पूल गेले असल्याने पिंपळसोंड, खुंटविहीर, शिराळा, अळीवपाडा, उंबरवाडा, दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, वाघाडी, आमदा, वांगण, वाजवड, उंबुरणे, मनखेड आदी गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 • गंगापूर धरणातून सायंकाळपर्यंत १० हजार क्युसेक विसर्ग
 • होळकर पुलाखालून १३ हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह
 • कादवा नदीवरील रौळस पिंपरी पुलावरील वाहतूक बंद
 • त्र्यंबकमध्ये तीन गावांशी संपर्क तुटला
 • त्र्यंबक गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत
 • राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल नाशकात दाखल
 • सप्तशृंग गडावर ढगफुटी, ७ भाविक जखमी
 • गोदाकाठावरील लहान पूल पाण्याखाली
 • मुसळधार पावसामुळे ७ नद्यांना पूर
 • नार-पार, अंबिका, वाझडी, तान-मान, कावेरी पिंजाळ, दमणगंगा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
 • दरड कोसळल्याने सापुतारा-नाशिक आंतरराज्य महामार्ग पूर्णपणे बंद
 • नदीकिनारी 65 वृद्धांना वाचवण्यात बचाव पथकाला यश
 • गोविंदनगरचा रस्ता खचला; नवीन नाशिकमध्ये घरात शिरले पाणी

 

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. आगामी चार दिवसात जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. : गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक