नाशिकमध्ये रविवारी २८ हजार विद्यार्थी देणार टीईटी

शहरात २८ परीक्षा केंद्रांचे नियोजन, विद्यार्थ्यांना २० मिनिट आधी उपस्थित राहण्याचे आवाहन

TET exams

नाशिक शहरात रविवारी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी दोन पेपर असून, पहिल्या पेपरसाठी १५ हजार, तर दुसऱ्यासाठी साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. दोन्ही पेपरच्या २८ हजार विद्यार्थ्यांसाठी शहरात २८ परीक्षा केंद्रांचं नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे आयोजित ‘टीईटी’ परीक्षेसाठी शहरातील ८१ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. यातील पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. या पेपरसाठी १५ हजार १४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी ४३ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० वाजेपर्यंत होणार आहे. या पेपरसाठी १३ हजार ५७७ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. ३८ केंद्रांवर हा पेपर घेतला जाईल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर परीक्षार्थींनी प्रवेश केंद्रावर उपस्थित राहावे, लागेल. त्यानंतर आलेल्या परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बॉलपेन, प्रवेशपत्र, फोटो, ओळखपत्र याव्यतिरीक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. विज्ञान, गणित, समाजशास्त्र विषयातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.