घरताज्या घडामोडीअबब! रस्त्याकडेला सापडला ३० लाखांचा गुटखा, घोटी परिसरातील घटना

अबब! रस्त्याकडेला सापडला ३० लाखांचा गुटखा, घोटी परिसरातील घटना

Subscribe

महामार्ग पोलिसांनी गुटखा भरलेली ३० पोती केली जप्त

इगतपुरी – तालुक्यातील घाटनदेवी भागातून ३० लाख रुपये किंमतीच्या गुटख्याची अज्ञात वाहनातून फेकलेली ३३ पोती जप्त करण्यात आली आहेत. इगतपुरीचे नगरसेवक संपत डावखर यांनी महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना याबाबत माहिती कळवली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी भेट देत गुटख्याची ३३ पोती अंदाजे किंमत ३० लाख रुपये असलेली पोती जप्त केली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण सोपवण्यात आले असून पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

आज दुपारी घाटनदेवी भागात नगरसेवक संपत डावखर गेले असता काही आदिवासी मुलांच्या हातात गुटख्याची पाकिटे त्यांना आढळली. त्यांनी अधिक चौकशी केली असता या परिसरात गुटख्याचा ट्रक असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना माहिती दिली. वालझाडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. ही घटना दुपारी सव्वादोनच्या सुमाराला घडली. घटनास्थळी ३३ मोठे सफेद रंगाचे बेवारस स्थितीमध्ये पडलेले पोते आढळून आले असून त्यामध्ये SAK असे इंग्रजी अक्षर लिहिलेली पाकिटे होती. त्याचा उग्र गुटख्याचा वास येत होता. सर्वसाधारण ३० लाख रुपये किंमतीचा गुटखा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

याबाबत तात्काळ इगतपुरी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. तसेच ठाणे कंट्रोल, मुंबई कंट्रोललासुद्धा माहिती कळविण्यात आलेली आहे. इगतपुरीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, शेंडे, विजय रुद्रे, जाधव यांच्या ताब्यात माल देण्यात आला. पुढील तपासासाठी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून कसून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -