Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र चक्क ! प्रश्नपत्रिका कमी पडल्याने पेपरला उशीर

चक्क ! प्रश्नपत्रिका कमी पडल्याने पेपरला उशीर

Subscribe

शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रकार

नाशिक : सहा महिन्यांपासून अनेकदा स्थगित झालेली शिष्यवृती परीक्षा अखेर रविवारी (दि.31) विविध केंद्रावर पार पडत असताना एच. ए. एल. हायस्कूल ओझर मिग येथील केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्याने विद्यार्थ्यांना उशिरा पेपर मिळाले. त्यांनी वाढीव वेळेची मागणी केली असताना परीक्षकांनी ती फेटाळून लावण्याचा प्रकार घडल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी केली. मात्र, असा काही प्रकारच घडला नाही, असे निफाडचे गट शिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी म्हटले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा अखेर रविवारी (दि.31) पार पडली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण 318 परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या 38 हजार 486 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 848 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपस्थितीचे हे प्रमाण 93.15 टक्के राहिले. दरम्यान, एच.ए.एल.हायस्कूल (इंग्रजी माध्यम)ओझरमिग येथे 160 परिक्षार्थी ही परीक्षा देणार होते. यासाठी सात परीक्षा हॉल उपलब्ध करुन देण्यात आले. सकाळी 11 वाजता पहिला पेपर सुरु झाला. मात्र, एक वाजून 30 मिनिटांनी बुद्धिमत्ता चाचणी या दुसर्‍या पेपरला चार क्रमांकाचे परीक्षा हॉलमधे परिक्षार्थींच्या संख्येइतक्या प्रश्नपत्रिका उपलब्ध नव्हत्या.

- Advertisement -

प्रश्नपत्रिका वाटप होईपर्यंत ही बाब संबंधितांना लक्षात आली नाही. मग धावपळ सुरु झाली. दहा ते पंधरा मिनिटे यात काही विद्यार्थ्यांची वाया गेला. जवळजवळ 15 मिनिटांनी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. यासंबंधीचे गांभीर्य पाळले गेले नाही, अशी पालकांनी तक्रार केली. याविषयी शिक्षण विभागाने दखल घेण्याची मागणी पालकांनी केली. जिल्ह्यात इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा 174 परीक्षा केंद्रांवर आयोजित केलेली होती. या परीक्षेसाठी एकूण 20 हजार 922 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी 19 हजार 445 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, उपस्थितीचे हे प्रमाण 92.94 टक्के राहिले. तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 144 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस प्रविष्ठ 17 हजार 564 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 403 विद्यार्थी उपस्थित होते. हे प्रमाण 93.39 टक्के इतके राहिले.शिष्यवृत्तीचा पेपर क्रमांक एक हा सकाळी अकरा ते दुपारी साडे बारा या वेळेत पार पडला. या पेपरमध्ये प्रथम भाषा विषयाचे पंचवीस व गणित विषयाचे 75 प्रश्न असे 75 प्रश्न दीडशे गुणांसाठी विचारण्यात आले. तर दीडशे गुणांसाठी पेपर क्रमांक दोन दुपारी दीड ते तीन या वेळेत पार पडला. या पेपरला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे अनुक्रमे 25 व 50 प्रश्न विचारण्यात आले.परीक्षेसाठी 318 केंद्रसंचालक, चार उपकेंद्रसंचालक, एक हजार 939 पर्यवेक्षक व 531 शिपाई यांनी जबाबदारी सांभाळली.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -