घरक्राइमसहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

Subscribe

नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक नगर या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या म्हैसवळण घाट रस्त्यावर रविवारी (दि.२२ सकाळी १२: १० वाजेदरम्यान विश्राम गडावरून टाकेद नाशिकच्या दिशेने सहलीसाठी निघालेल्या बसला ब्रेकफेलमुळे अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, १० जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दुवा पाटील, सिद्धेश विभांडीक, चिन्मय देशमुख, सायली जोशी, आकांक्षा प्रधान अशी जखमी मुलांची नावे आहेत.
इस्कॉन मंदिर संस्थेतर्फे सुमारे ४० विद्यार्थी टाकेद तीर्थावर आले होते. त्यानंतर ते विश्रामगड (पट्टाकिल्ला) भेट देऊन आले. परतीच्या प्रवासात म्हैसवळण घाटात बसाचा ब्रेकफेल झाला. बस दरीत जाऊ नये व मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी चालक सलीम शेख यांनी प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्याकडे नेली. त्यावेळी भरधाव बस पलटी झाली. त्यात १० विद्यार्थी जखमी झाले तर चार जण गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, पत्रकार शाहाबाज शेख यांनी एसएमबीटी रुग्णालयातील व्यवस्थापक सूरज कडलग यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ एसएमबीटी रुग्णालयाकडून घटनास्थळी दोन कार्डियाक रुग्णावाहिका पाठविण्यात आल्या. तोपर्यंत जखमींना स्थानिक ग्रामस्थ शिवा फोडसे, अमोल धादवड यांच्या टीमने स्थानिक ग्रामस्थ प्रवासी वाहनधारकांनी बाहेर काढले. जखमींसह सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल दुमसे, शिवाजी जुंदरे,बाळासाहेब राऊत, रामकृष्ण लहामटे, पोलीस हवालदार सुहास गोसावी, दत्ता गायकवाड आदींसह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस उभी करण्यात आली.

- Advertisement -

म्हैसवळण घाट रस्त्याची अनेक दिवसांपासून दूरावस्था झाली आहे. या भागात नेहमी प्रवासी वाहनधारकांसह पर्यटकांना ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्याच्या खडतर परिस्थितीमुळे म्हैसवळण घाटात सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. तरीही, रस्त्याच्या दूरावस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित प्रशासनाने बांधकाम विभागाने लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. म्हैसवळण घाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक प्रवासी व वाहनधारकांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -