घरमहाराष्ट्रनाशिकदसर्‍यानंतर पोलीस अधीक्षक करणार आंदोलनकर्त्यांशी चर्चा

दसर्‍यानंतर पोलीस अधीक्षक करणार आंदोलनकर्त्यांशी चर्चा

Subscribe

प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेरमधील गोहत्येसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनतर त्यांनी दसर्‍यानंतर सोमवारी संगमनेर येथे येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून दोषी पोलीस आधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असणारे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

संगमनेर येथील पोलीस प्रशासनाला अंधारात ठेवून श्रीरामपुरचे पोलीसउपाधी क्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जम जम कॉलनीत छापा टाकून ३२ हजार किलो गोमांस आणि ७१ गोवंश जनावरांची कत्तलीतून मुक्तता केली होती. मात्र, अनधिकृत कत्तलखाने चालविणार्‍यांना पाठबळ देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लेखी देऊनसुद्धा अद्याप कारवाई झाली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनानी गेल्या दोन दिवसांपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

- Advertisement -

गोतस्करांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संगमनेरात हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन सुरू असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिली. त्यानंतर या आंदोलकांच्या मागणीच्या संदर्भात आ. विखे-पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर नवरात्र व दसर्‍याचा सण झाल्यानंतर पुढील आठवड्यात सोमवारी मी स्वतः संगमनेरात जाऊन आंदोलकांशी त्यांनी केलेल्या मागणीबाबत सविस्तर चर्चा करेल. त्यामुळे त्यांनी आता सणासुदीच्या दिवसात हे आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्फत आंदोलनकर्ते यांच्याकडे केली. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, अमोल खताळ, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हे आंदोलन स्थगित करावे, असे आ. विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्याना सांगितले. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष गणपुले यांनी आंदोलनकर्त्यांसमोर आपण हे ठिय्या आंदोलन स्थगित करत आहे. मात्र, दसरा सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी गोहत्ये विरोधात जनजगृती करा, असे गणपुले यांनी सांगितले. त्यानंतर सर्वांनी त्यांच्या म्हणण्यास प्रतिसाद देत हे आंदोलन बुधवारी सायंकाळी आठ वाजता तब्बल ३६ तासानंतर स्थगित केले.

चौकट- मतांसाठी कारवाईचा आरोप

काँग्रेस पक्षाचे सुरुवातीचे निवडणूक चिन्ह बैलजोडी व नंतर गाय-वासरु होते. त्याचा वापर करुन काँग्रेसने देशावर राज्य ही केले आहे. मात्र, त्या पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना आत त्याचा विसर पडला आहे. एखाद्या समाजातील मुठभर लोकांच्या कृत्यामुळे जर बहुसंख्य समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असतील, तर अशा गोष्टी विनाविलंब बंद व्हायला हवे होते. मात्र, संगमनेरचे नेते केवळ मतांसाठी या गोतस्करांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचा आरोप कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संगमनेरात येऊन हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन केला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -