घरमहाराष्ट्रनाशिकआघाडी-युतीमध्ये आरोपांच्या फैरी

आघाडी-युतीमध्ये आरोपांच्या फैरी

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता विविध मुद्द्यांवरुन आघाडी आणि युती यांच्यात आरोपांच्या फैरींना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोकाटेंच्या माघारीबाबत पालकमंत्र्यांनाही मोठा विश्वास असल्याचे दिसून आले.

चौकीदारांनीच पळवले नाशिकचे प्रकल्प : जाधव

नाशिक महानगरपालिका, राज्यात आणि केंद्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार असल्याने नाशिककरांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्यातच मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले. त्यामुळे नाशिकचा विकास होईल, असे नाशिककरांना वाटत होते. पण चौकीदाराची भूमिका निभवण्याऐवजी नाशिकचे प्रकल्प पळवले गेले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार जयवंत जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले, नाशिकचा विकास आणि प्रगती साधणारे विकास प्रकल्प पळवले जात असताना पालकमंत्री गिरीश महाजन आणि स्वयंघोषित ‘पालक’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकीदारांची भूमिका बजावण्याऐवजी चोरीला मदत करून नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. ‘चोर तो चोर वरतून शिरजोर’ अशी भूमिका वठवून स्वयंघोषित पालकांनी नाशिकच्या तोंडातील विकासाचा घास हिरावून घेतला. आता ही मंडळी तोंडं उघडू लागली असली तरी ‘खोटं बोला पण रेटून बोला’ या नीतीचा अवलंब करून मतदारांच्या डोळ्यांत धूळफेक करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पाण्यावरून नाशिक विरुद्ध नगर आणि नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष नाशिक अधूनमधून पाहायला मिळतो. हा संघर्ष टाळण्यासाठी दमणगंगा, पिंजाळ व नारपार या नद्यांचे समुद्राला जाणारे १५७ टीएमसी पाणी अडवून गोदावरी व गिरणाखोर्‍यात टाकण्याची शिफारस चितळे समितीने केली होती.

काँग्रेसला भाजपची चपराक : राऊत

नाशिक जाहीरनामा म्हणजे काँग्रसच्या ‘अब होगा न्याय’ ला दिलेलं हे चांगलं उत्तर आहे. राममंदिर, काश्मीरमधील ३५ अ चा कलम रदद करणे आदी मुद्यांचा जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे देशभक्तीने प्रेरित असा हा जाहीरनामा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात गोडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा राम मंदिराचा राग आळवला आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यातून राम मंदिराच्या मुद्याला हात घालतानाच जम्मू-काश्मीरमधून ३५-अ कलम हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. याबाबत राऊत म्हणाले, हा जाहीरनामा केवळ भाजपचा नाही तर राष्ट्राचा आहे. देशभक्तीने प्रेरित, असा जाहीरनामा आहे. काही प्रश्नांसदर्भात २०१४ मध्ये आश्वासन दिली होती, पण काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकली नाही. यात राममंदिराचा मुददा असेल. ३७० कलम रदद करणे, समान नागरी कायदा, काश्मीरमधील ३५ अ चा कायदा रदद करणे असेल, युती सरकार सत्तेवर आल्यावर ही आश्वासने निश्चितपणे पूर्ण केली जातील. ३७० कलम रद्द करणे शहिदांना आदरांजली असेल. राममंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. सत्ता आल्यास आम्ही निश्चितपणे अध्यादेश काढून राममंदिराचा प्रश्न मार्गी लावू ,असे ते म्हणाले.

कोकाटेंनी युती धर्म पाळावा

नाशिकमधून भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची उमेदवारी युतीच्या उमेदवारासाठी धोकादायक मानली जात आहे. याबाबत राऊत म्हणाले, निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. अनेक नाराजांनी अर्ज भरले, पण ते मागे घेतले. काकाटेही युती धर्म पाळतील आणि मुख्यमंत्र्यांचे ऐकतील. मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

कोकाटे माघार घेतील : महाजन

नाशिक युतीच्या ताब्यात असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यांची बंडखोरी पक्षाला मारक ठरणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री स्वतः कोकाटे यांच्या संपर्कात असून निश्चितपणे ते माघार घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

कोकाटे यांची उमेदवारी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी धोकादायक मानली जात आहे. यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, याबाबत स्वतः मुख्यमंत्री कोकाटे यांच्या संपर्कात आहेत त्यांची चर्चा सुरू आहे. अजून माघारीपर्यंत वेळ आहे. अर्ज भरतील त्यांची समजूत काढली जाईल. त्यामुळे कोकाटेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वच बंडखोर माघार घेतील, असे सांगत उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार अधिक चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखेंचे आम्ही स्वागत करतो

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत महाजन म्हणाले, मला कल्पना नाही; आघाडीतील अनेक नेते भाजपात येत आहेत. अजूनही काही नेते भाजपात येऊ इच्छितात. विजयसिंग मोहिते पाटील, निबांळकर भाजपात आले आहे. विखेंचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेही भाजपात येत असतील, तर त्यात काही वावगं नाही. ते आल्यास त्यांचे स्वागतच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -