घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसावधान! लम्पीचा प्रभाव पुन्हा वाढतोय, दोन जनावरे दगावली; 'झेडपी' प्रशासन अलर्ट मोडवर

सावधान! लम्पीचा प्रभाव पुन्हा वाढतोय, दोन जनावरे दगावली; ‘झेडपी’ प्रशासन अलर्ट मोडवर

Subscribe

नाशिक : जिल्ह्यात लम्पीने 2 पशुंचा बळी घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून ज्याठिकाणी पशुंचा मृत्यू झाला त्याच्या 5 किलोमीटरच्या परिक्षेत्रात पुन्हा एकदा 100 टक़्के लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी तालुकास्तरावरील टीम पाठविण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात दोन ठिकाणी लम्पीमुळे दोन गोवंशीय जनावरांचा मृत्यू झाल्याने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. याचबरोबर माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहिमेंतर्गत गोठे स्वच्छ करण्याचे निर्देशही विभागाने दिले आहे. जिल्ह्यात एकूण 8 लाख 90 हजार गोवंशीय पशुधन असून यापैकी 4 लाख 47 हजार पशुधनाचे लम्पीप्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात 40 पशुंमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आली. त्यांच्यावर तत्काळ लम्पीप्रतिबंधक उपाययोजना सुरु करण्यात आल्याने 40 पशुंपैकी 34 जनावरे लम्पीमुक्त झाली असून उर्वरीत 6 पैकी 2 गोवंशीय जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांमध्ये लम्पीची सौम्य लक्षणे आहेत.

- Advertisement -

राज्यात गत वर्षी लम्पीचा प्रादुर्भाव जोरावर असताना सुरक्षित असणार्‍या नाशिक जिल्ह्यात पहिली लम्पीची लागन अहमदनगरमधून सिन्नरमध्ये (जि. नाशिक)झालेल्या जनावरांच्या वाहतुकीमुळे झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात पसरलेल्या लम्पी स्कीन आजाराने जवळपास ११५ जनावरांचा बळी घेतला. यापैकी १०३ पशूमालकांना २६ लाख ७९ हजार रुपयांची मदत जिल्हा पशूसंवर्धनविभागाकडुुन देण्यात आली.तर उर्वरित प्रस्ताव प्रक्रियेत असल्याने प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण १९०७ पशूंना या आजाराची लागण झाली होती. सुरुवातीपासूनच नाशिक जिल्ह्यात हा आजार नियंत्रित राहिला होता.नंतरच्या टप्प्यात शेजारील जिल्ह्यांमधून झालेल्या जनावरांच्या वाहतुकीद्वारे या आजाराने जिल्ह्यात प्रवेश केला आणि यानंतर पशूंचे मृत्यू होण्यास सुरुवात झाली.

पशूसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर देऊन या मृत्यूदरावर बजयापैकी नियंत्रण आणले होते. त्यात ११५ लम्पीबाधित जनावरांचे मृत्यू झाला होता. लम्पी चा हा संसर्ग पुन्हा नाशिक जिल्ह्यात सुरु झाला असून या आजारामुळे मालेगाव व दिंडोरी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एका शेतक्र्यांच्या १६ महिन्याच्या वासराला हा आजार झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली
असून पशुमालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर मालेगाव तालुक्यातील मौजे टाकळी व सिन्नर तालुक्यातील मौजे माळेगाव या ठिकाणी जनांवरांमध्ये लंम्पी स्कीन आजार या साथ रोग आजाराची लक्षणे आढळुुन आलेली आहेत. तसेच आजाराच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेचे निष्कर्ष होकारार्थी आलेले आहेत.त्यामुळे या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शक्याता वर्तवण्यात आली आहे.

लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी गोठे स्वच्छता,लसीकरण आणि प्रतिबंधीत क्षेत्र असे उपाय सुरू आहे . जिल्हा परिषद गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या आजारावर नक्कीच नियंत्रण मिळवेल. : संजय शिंदे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -