घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखुशखबर! भंडारदरा धरण पूर्णतः भरले; पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाचा परिणाम

खुशखबर! भंडारदरा धरण पूर्णतः भरले; पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाचा परिणाम

Subscribe

नाशिक : पाणलोट क्षेत्रात आठवडाभर कोसळलेल्या पावसाने उत्तर नगर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धरणांमधील पाणीपातळी समाधानकारक स्थितीत पोहोचवली असून उत्तरेला वरदान ठरलेल्या भंडारदर्‍याच्या पाणीसाठ्याने आज सकाळी सहा वाजता 10 हजार दशलक्ष घनफूटाची पातळी ओलांडली आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असतांनाही धरणात ताशी 10 दशलक्ष घनफूटाची आवक सुरुच असल्याने या स्थितीतही भंडारदरा धरण येत्या 24 तासांतच तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता आहे. 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाने 10 हजार 500 दशलक्ष घनफूटाची (95 टक्के) पातळी गाठल्यानंतर हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे मानले जाते. आज सकाळी भंडारदर्‍याचा पाणीसाठा 10 हजार 46 दशलक्ष घनफूट (91 टक्के) झाला होता. भंडारदर्‍यासह जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठाही 70 टक्के झाला असून निळवंड्यात 80 टक्के तर आढळा धरणात 76 टक्के पाणी जमा झाले आहे.

सुरुवातीचा दीड महिना जेमतेम पावसात गेल्यानंतर जुलैच्या मध्यात पाणलोटात परतलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांचे चित्र पालटून टाकले आहे. गेल्या पंधरा दिवसांत मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा व भोजापूर या सर्वच जलाशयांच्या पाणलोटात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावणार्‍या वरुणराजाने धरणांमधील जलसाठे फुगवण्यासोबतच लाभक्षेत्रातही चैतन्य निर्माण केले आहे. यंदाच्या हंगामात मुळा खोर्‍याच्या तुलनेत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक असल्याचेही दिसून आले असून पाऊस सुरु झाल्यापासून आजवर भंडारदर्‍यात 9 हजार 843 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले असून त्या तुलनेत अधिक पावसाचा प्रदेश असलेल्या मुळा खोर्‍यातून मुळा धरणात 9 हजार 604 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. अर्थात मुळा खोर्‍यात अंबित, शिरपूंजे, पिंपळगाव खांड यासारख्या लघुपाटबंधारे प्रकल्पांचाही समावेश असून सदरील प्रकल्प ओसंडल्यानंतरच मुळा धरणात पाण्याची आवक सुरु होते.

- Advertisement -

भंडारदरा धरण बहुतेकवेळा 15 ऑगस्टपूर्वीच ओव्हर फ्लो होते असा इतिहास आहे. यंदाही याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असून येत्या 24 तासांतच धरण तांत्रिक पातळी गाठणार आहे. सद्यस्थितीत या धरणाच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. गेल्या चोवीस तासात भंडारदर्‍याच्या पाणलोटातील रतनवाडीत 67 मि.मी., घाटघर येथे 60 मि.मी., पांजरे येथे 55 मि.मी., भंडारदरा येथे 43 मि.मी., वाकी येथे 31 मि.मी. तर निळवंड्यात पाच मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 24 तासांत धरणात 257 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातून 825 क्युसेकने विद्युत निर्मितीसाठी 70 दशलक्ष घनफूट पाणी खर्च करण्यात आले असून उर्वरीत 187 दशलक्ष घनफूटाचा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजता धरणाचा एकूण पाणीसाठा 10 हजार 46 दशलक्ष घनफूट झाला होता. तालुक्याच्या पूर्वभागातील आढळा व भोजापूर या दोन्ही जलाशयांच्या पाणलोटातही पाऊस सुरु असून या दोन्ही जलाशयांमध्ये अत्यंत धिम्या गतीने पाण्याची पातळी वाढत आहे. आढळा धरणाचा पाणीसाठा 804 दशलक्ष घनफूट (75.85 टक्के) झाला आहे. त्यामुळे उत्तरेतील धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाचा लहरीपणा लक्षात घेता जलसंपदा विभागाने पावसाचा जोर ओसरताच धरणाचा सांडवा बंद केल्याने आज सकाळी धरणाने भिंतीजवळील 215 फूटांपैकी 211.55 फूटाची पातळी गाठली आहे. पुढील 72 तासांत पाणलोटात ममुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने प्रत्यक्षात तसे घडल्यास पुढील 24 तासांच्या आंतच भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता आहे. 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात 10 हजार 500 दशलक्ष घनफूट ( 95 टक्के) पाणी जमा झाल्यानंतर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे समजले जाते. भंडारदरा धरण भरल्यानंतर निळवंडे धरणही ओसंडून वाहण्यास सुरुवात होते.त्यानंतर प्रवरा नदीपात्रातून पाणी जायकवाडी कडे झेपावणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -