घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये युतीची ‘अशीही बदलाबदली’!

नाशिकमध्ये युतीची ‘अशीही बदलाबदली’!

Subscribe

नाशिकच्या जागेवर भाजपचा दावा; दिंडोरीत खासदार हरिश्चंद्र चव्हाणांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांची कोंडी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आता त्यांच्या जागेवर दावा केल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील एक गटही या बदलासाठी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. तर दिंडोरी मतदारसंघात भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी पक्षातीलच काही मंडळींकडून आग्रह केला जात असल्याचे चित्र आहे.

विद्यमान खासदारांना डावलणार?

स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढविण्याची भाषा शिवसेनेने चार वर्षांपासून सुरू केल्याने या पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीतही इच्छुकांची संख्या मोठी आहे. नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन मतदारसंघ आहे. त्यातील नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या खासदार हेमंत गोडसे करीत आहेत. सहा विद्यमान खासदारांना उमेदवारीपासून वंचित ठेवले जात नाही असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे गोडसे हे निश्चिंत होते. मात्र युती जाहीर झाल्यानंतर मात्र पक्षातील काही पदाधिकारी माजी आमदार तथा भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीसाठी ‘फिल्डींग’ लावत असल्याचे दिसतात. युतीच्या घोषणेनंतर माणिकराव यांची कोंडी झाली असून त्यांच्यासाठी नाशिक मतदारसंघातील पक्षबदलाचे ‘रेड कार्पेट’ टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले खासदार गोडसे?

खासदार गोडसे यांना याबाबत संपर्क साधला असता, कोणी कितीही प्रयत्न केले तरी मला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पक्षप्रमुखांनी तीन दिवसांपूर्वीच स्पष्ट केल्याने मी प्रचारकार्याला लागलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीवर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचा दावा करीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी करावी, असाही प्रस्ताव पुढे आला आहे. विशेष म्हणजे खासदार चव्हाण यांच्या समर्थकांमध्येही या नव्या प्रस्तावाप्रती सकारात्मकता असल्याचे कळते. त्यामुळे आगामी निवडणुकीत यापूर्वीच्याच उमेदवारांना आपापल्या पक्षाचे तिकीट मिळते का, विद्यमान खासदारांना टाळून उमेदवार बदलला जातो का आणि दोन्ही मतदारसंघांत पक्षबदल होईल का हे बघणे आता औत्स्युक्याचे ठरणार आहे.

नाशिकमध्ये युतीची ‘अशीही बदलाबदली’!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -