घरमहाराष्ट्रनाशिकसुताचे बंडल भासवत कोट्यावधी मद्यसाठ्याची वाहतूक

सुताचे बंडल भासवत कोट्यावधी मद्यसाठ्याची वाहतूक

Subscribe

बारा टायरच्या मालट्रकमध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून कोट्यावधींचा अवैध मद्यसाठा वाहतूक करणारा मालट्रक सोमवारी (दि.४) सायंकाळी सात वाजता वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) विभागीय भरारी पथकाने सापळा रचत पकडला. पथकास एकास अटक केली असून एकजण फरार झाला आहे. ट्रकमधील हरियाणा व अरूणाचल प्रदेशनिर्मीत आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध्य मद्यवाहतूकीमागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे बोलले जात आहे.

सतीश शिव सिंग (रा.खानपुरा धौलपुर,राजस्थान) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातून रविवारी (दि.) मोठ्या प्रमाणात अवैध देशी व विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय भरारी पथक तस्करांच्या मागावर असताना वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात मद्याने भरलेला मालट्रक पथकाच्या हाती लागला. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने गोंडेगाव फाटा येथे सापळा लावला असता बाराचाकी मालट्रक (एमएच ४० बीएल ४५०८) मध्ये राज्यात बंदी असलेला हरियाणा व अरूणाचल प्रदेशात निर्मीत मद्यसाठा मिळून आला. मालट्रकमध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून चोरकप्यातून ही चोरटी वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. पथकाची चाहूल लागताच ट्रकचालक सुवन अवतार सिंग फरार झाला. त्याचा साथीदार सतीश शिवसिंग यास पथकाने अटक केली. या मद्यवाहतूकीत आंतरराराज्य टोळीचा समावेश असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीने पथक शोध घेत आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे करीत आहेत.

पथकाच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न

मालट्रकमधून मॅकडॉल, इम्परीयल ब्ल्यू, रॉयल चॅलेंज आदी विविध प्रकारचे सुमारे ९४५ विदेशी दारूचे बॉक्स वाहतूक होत असल्याचे पुढे आले आहे. पथकाने १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किंमतीच्या मुद्देमालासह अटक केलेल्या संशयीतास पथक मुख्यालयात घेवून येत असताना द्वारका परिसरात सतीश शिवसिंग याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यास पकडण्यात पथकाला यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -