निफाडचा पारा 6.1 अंशावर

राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; नाशिकमध्ये थंडीची लाट

नाशिक : गेल्या 24 तासांत तापमानात कमालीची घट झाली असून नाशिक जिल्ह्याचा पारा 7.1 टक्के तर, निफाड तालुक्यात राज्यातील सर्वात निचांकी तापमान 6.1 डिग्री सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. येत्या दोन दिवसांत आणखी थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवल्याने चिंतेत भर पडली आहे.

उत्तर भारतातही थंडीची लाट आली आहे. राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यात पाऊस पडत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसामुळे गेल्या 24 तासांत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यांच्या तापमानात कमालिची घट झाली आहे. विदर्भातून वाशिममध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पण, पाऊस आणि वाढत्या थंडीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

थंडी ही गव्हाच्या पीकास पोषक मानली जात असून, कांद्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सकाळी पडणार्‍या धुक्यामुळे कांद्याची पात पिवळी पडण्याचा धोका असतो. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात तापमान 2-3 अंशाने खाली उतरणार आहे. त्यामुळे काही भागात थंडीचे प्रमाण वाढणार असून नागरिकांना आणखी बोचर्‍या थंडीचा सामना करावा लागू शकतो.