घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या पंचवटीतील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती

नाशिकच्या पंचवटीतील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती

Subscribe

जगदीश पाटलांच्या पाठपुराव्याला यश; पंचवटीत क्रीडांगणासाठी आरक्षण

नाशिक – पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व्हे क्रमांक १५९(पै.) या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या संपादनात झालेल्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील यांच्या लढ्याला यानिमित्त अखेर यश आले आहे.

जगदीश पाटील यांनी हा घोटाळा उघडकीस आणला असून या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महासभेने आदेश दिल्यानंतरही अधिकार्‍यांकडून टोलवाटोलवी केली गेल्याने पाटील यांनी महासभेवर थेट हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतरही बराच संघर्ष केल्यानंतर अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. अतिरीक्त आयुक्त (शहर) खाडे हे या चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. नगररचना सहायक संचालकपदाचा कार्यभार असलेले सी. बी. आहेर या समितीचे सदस्य सचिव तर मुख्य लेखा परीक्षक बोधीकिरण सोनकांबळे हे सदस्य आहेत. माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, स्वत: माजी गटनेते पाटील व शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे हे या चौकशी समितीवर नामनिर्देशित सदस्य आहेत. चौकशी समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अयुक्त जाधव यांनी दिले आहेत.

- Advertisement -

बांधकाम असतानाही भूसंपादन

या भूखंडावर बांधीव शेड आणि अतिक्रमण असतानाही भूसंपादनाची कारवाई केली गेली. त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम महापालिकेच्या खर्चाने हटवावे लागले. त्याची भरपाईसुद्धा महापालिकेने घेतलेली नाही. कमी क्षेत्राची खरेदी करून टीडीआर मात्र पूर्ण भूखंडावर देण्यात आला. इतके करूनही या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर मालकसदरी महापालिकेचे नाव लागले नाही.

टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या प्रकरणाची दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
–  जगदीश पाटील,
माजी गटनेते, भाजप

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -