घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअवैध उत्खनन प्रश्नी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार, गौण खनिज विभागाची मात्र डोळेझाक

अवैध उत्खनन प्रश्नी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार, गौण खनिज विभागाची मात्र डोळेझाक

Subscribe

खडी क्रशरसाठी कोणतीही परवानगी नसतांना चांदवड तालुक्यातील गोहरण येथे अवैध उत्खनन केले जात असल्याप्रकरणी थेट जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी थेट तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकारी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाकडून या प्रकरणाकडे सोयीस्कर डोळेझाक तर केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतीच्या हद्दित उत्खनन करण्यासाठी किंवा खडी क्रशर प्लान्ट सुरु करण्यापूर्वी विविध विभागांची परवानगी घ्यावी लागते. गोहरणच्या शिवारात खडी क्रशर प्लॅन्टसाठी यापुढे परवानगी न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०१९ रोजी मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीने ठराव केलेला असताना येथील नितीन गुंजाळ, सचिन अग्रवाल व नितीन आहेर यांच्या नावावर असलेल्या गट क्र.२१८/३ या गटात उत्खनन करण्यात आले. याविषयी थेट जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी येथील खडी क्रशरची पाहणी करत ते सील केले आहे. पण संबंधित व्यक्तीने कोट्यावधी रुपयांचे मशिन्स येथे उभे करुन यापूर्वीच उत्खनन केले. खडी क्रशर प्लान्ट चालवला, त्याचे काय? प्लान्ट सुरु करण्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळासह जिल्हा गौणखनिज विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. पण या विभागांना अंधारात ठेवून थेट उत्खनन सुरु केले.

- Advertisement -

पाटचारीच्या सिमेंट काँक्रिटिकरण करण्याचे शासकीय कंत्राट मिळाल्याने हे उत्खनन झाल्याचे आता सांगण्यात येते. पण संबंधित विभागांकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु संबधित क्रशरचालकाने कोणतीही परवानगी घेतली गेल्याचे दिसून येत नाही. जिल्हाधिकार्‍यांच्या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीने गौणखनिज विभागाकडे अर्ज सादर करुन उत्खननाची परवानगी मागितली आहे. मार्चअखेर सुमारे अडीच कोटी रुपये रॉयल्टी त्यांनी जमा केल्याचे समजते. गौणखनिज विभागाने एप्रिलमध्ये त्यांना उत्खननाची परवानगी दिल्याचे जिल्हा गौणखनिज विभागाने म्हटले आहे. मात्र, यापूर्वी झालेले उत्खनन व विनापरवनागी सुरु असलेले खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुन्हा परवानगीची घाई
गोहरणचे उत्खनन व खडी क्रशर प्लान्ट बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला. पण आता संबंधित विभागाकडे रितसर अर्ज करुन परवानगी मिळवण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे समजते. गौणखनिज विभागाने तातडीने याप्रकरणाची फाईल मालेगावला पाठवली आहे. त्यामुळे खडी क्रशर पुन्हा सुरु करण्याची घाई केली जात असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने केला ठराव
गोहरणच्या शिवारातील गट क्र.१४१/२ मध्ये ओम इंडस्ट्रीज पार्टनर व गट क्र.१५८ मधील साईराम स्टोन क्रेशर वगैरे कायमस्वरुपी बंद करण्याचा ठराव ३१ ऑगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे यापूर्वी २०१७ व २०१८ ला दिलेल्या मंजूरीचे ठराव विखंडीत झाले आणि यापुढे कुठल्याही उत्खननास परवानगी न देण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर केला आहे.

बेकायदेशिरपणे सुरु असलेला खडी क्रशर प्लान्ट संबंधित तहसीलदारांनी सील केला आहे. यापूर्वी त्यांनी केलेले उत्खनन आणि त्यासंदर्भातील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय या प्लान्टला परवानगी दिली जाणार नाही.
-रोहिणी चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -