घरमुंबईLok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रचार सुरू

Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रचार सुरू

Subscribe

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून भाजपा आणि शिंदे गटात अजूनही रस्सीखेच सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक यांनी भाईंदरमधून निवडणूक प्रचारास सुरुवात करत पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून भाजपा आणि शिंदे गटात अजूनही रस्सीखेच सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक यांनी भाईंदरमधून निवडणूक प्रचारास सुरुवात करत पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शिंदेच्या बालेकिल्लात भाजपाने धोबीपछाड करत त्यांच्या नाकावर टिचून जागा खेचून घेत प्रचार सुरू केला आहे. एवढंच नाहीतर शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह असू शकते असे वक्तव्य संजीव नाईक यांनी केल्याने तेच महायुतीचे उमेदवार असतील असे संकेत मिळत आहे. (Lok Sabha Election 2024 Campaigning by BJP in Thane Lok Sabha Constituency has started)

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच ठाणे लोकसभा मतदारसंघातील आहेत. परंतु ठाण्यावरून भाजपा व शिवसेना शिंदे गटात घोडे अडले असून शिवसेना शिंदे गटाची प्रतिष्ठा ठाणे लोकसभा मतदार संघावर लागली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला की भाजपाच्या वाट्याला येणार हेच अजून निश्चित झालेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारांना सर्व संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याने महाविकास आघाडीचे खासदार राजन विचारे यांच्या समोर तगडा उमेदवार देण्यासाठी संजीव नाईक यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ते शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन राजन विचारे हे दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. परंतु यंदा शिवसेना ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरून लढल्यास त्याचा फायदा देखील संजीव नाईक यांना होणार अशी अटकळ असू शकते.

- Advertisement -

शिवसेना (शिंदे) गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे इच्छुक असून ओवळा माजिवडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे. भाजपाकडून या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे नाव मध्यंतरी चर्चेत होते. डॉ. सहस्त्रबुद्धे हे सक्रिय सुद्धा झाले होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून डॉ. सहस्त्रबुद्धे यांचे नाव मागे पडले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खासदार म्हणून निवडून आलेले आणि सध्या भाजपात असलेले संजीव नाईक हे आता उमेदवार म्हणून जोरदार प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – MNS : भाजपा समर्थन आणि विरोधाच्या हिंदोळ्यावरचा मनसे मेळावा, आज कोणती भूमिका?

शिवसेना व भाजपाने अजूनही ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे जाहीर केलेले नसले तरी भाजपाकडून संजीव नाईक यांनी भाईंदरच्या बालाजी नगरमधून त्यांच्या प्रचाराची रविवारी सुरुवात केली आहे. बालाजी नगरमधील एका सभागृहात त्यांनी स्थानिक रहिवाशांसोबत बैठक घेतली. त्यात भाजपाचे काही माजी नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना संजीव नाईक यांनी पक्षाने आपल्याला उमेदवारीच्या अनुषंगाने करण्यास हिरवा कंदील दिला असल्याचे म्हटले आहे. जवळपास 99 टक्के आपली उमेदवारी निश्चित असून चिन्ह हे कमळ की धनुष्यबाण असेल हे आपणास माहीत नाही. परंतु आपली तीव्र इच्छा ही कमळाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवायची आहे. परंतु पक्षश्रेष्ठी जो काय निर्णय घेतील त्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा दावा हा बळकट केल्याचे देखील मानले जात होते. तर संजीव नाईक हे भाजपाचे जरी असले तरी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून देखील ते निवडणूक लढण्याची शक्यता सुद्धा बळावली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून संजीव नाईक यांच्या नावाची घोषणा करण्याचा दबाव वाढवण्याची शक्यता आहे. एकूणच शिवसेना शिंदे गटाने पारंपारिक शिवसेनेचा गड असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडल्यास किंवा शिवसेनेच्या चिन्हावर भाजपाचे संजीव नाईक यांची उमेदवारी निश्चित केल्यास राजकिय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Lok Sabha : बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात; राजेंद्र गावितांना विरोध कायम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -