तुंबलेल्या नाल्याचा अंदाज न आल्याने कंडक्टरचा बळी

पेठ : येथील नगर पंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात तुंबलेल्या नाल्यात पाय घसरून पडल्यामुळे येथील आगरात कंडक्टर म्हणून कर्तव्यास असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जुने बसस्टॅण्ड आणि पंचायत समितीसमोरच्या चौकात नगर पंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यासमोरच गटार तुंबली असून, या गटारीत पेठ आगारात कंडक्टर म्हणून कर्तव्यास असलेले यशवंत जिवला लहारे (वय ५०, मूळ रा. कळमुस्ते, ता. त्र्यंबकेश्वर) हे पाय घसरून पडले. बराच वेळ त्यांना वर येता न आल्याने ते या गटारीत अकडलेले होते. काही वेळाने हा प्रकार परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लहारे यांना बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी लहारे यांना तपासून मृत घोषित केले.

पेठ आगारात कर्तव्यास असल्याने लहारे हे पेठमध्येच रहायला होते. त्यांच्या अशा अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.