घरमहाराष्ट्रनाशिकवॉईन शॉप, बिअर शॉपच्या आवारात दारु पिणे पडणार महागात

वॉईन शॉप, बिअर शॉपच्या आवारात दारु पिणे पडणार महागात

Subscribe

विक्रेत्यासह मद्यपींवर होणार कठोर कारवाई; आयुक्त कांतीलाल उमाप यांचे निर्देश

नशिक : वॉईन शॉप व बिअर दुकानदारांनी मद्यपींना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास संबंधित मद्यविक्री लायसन्सधारकासह मद्यपींवर देखील कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागा(एक्साईज)चे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांनी मद्यविक्री दुकानांची नियमित तपासणी करावी. हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, याची दक्षता संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी घ्यावी, असेही निर्देशात म्हटले आहे. निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाणार आहे.

महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअंतर्गत पारित वेगवेगळ्या नियमावलीअंतर्गत मद्यविक्री व्यवहारासाठी विविध प्रकारचे अबकारी नियम मंजूर करण्यात आले आहेत. या कायद्यामधील तरतुदी व त्याअंतर्गत वेगवेगळे नियम, आदेश, अटी, शर्तीनुसार रितसर व्यवहारासाठी शासनातर्फे विशेष अधिकारांतर्गत विहित मुदतीसाठी दिल्या जातात. मुदत संपल्यानंतर नियमातील तरतुदीनुसार संबंधित लायसन्सधारकाने विनंती केल्यास नूतनीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या लायसन्स व्यवहारासाठीच्या अटी, शर्ती, नियम, तरतुदींशी संबंधित लायसन्सधारक व अधिकारी, कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आली आहे. मात्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्नामध्ये वाईन शॉप तसेच वाईन अ‍ॅण्ड बिअर शॉपी परिसरात मद्य पिण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. ही बाब बेकायदेशीर आहे. यावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे अमलबजावणी करण्याचे सूचित कर निर्देश देत अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्व संबंधित अबकारी लायसन्सधारकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यातील मद्य लायसन्सधारकांना सीलबंद बाटलीतून मद्य घरी घेऊन जाण्यासाठी विक्रीची तरतूद आहे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त उमाप यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदा मद्यविक्री करणार्‍या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

असे आहेत ‘एक्साईज’चे निर्देश

ग्राहकांना वॉईन शॉप व बिअर शॉपजवळ किंवा आसपासच्या परिसरात मद्य पिण्यासाठी जागा किंवा इतर सुविधा देवू नयेत. तसे केल्यास लायसन्सधारकावर कठोर कारवाई करावी. ज्या लायसन्सधारकांना मद्यविक्रीची परवानगी असताना दोन किंवा त्यापेक्षा जादा ग्राहकांना दुकानात किंवा दुकानाच्या काऊंटरवर मद्य पिण्यास दिल्याचे आढळल्यास संबंधित लायसन्सधारकावर गुन्हा नोंदवावा किंवा कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन करुन परवानगी नसतानाही लायसन्सधारक मद्यविक्रेते दुकान किंवा आसपासच्या परिसरात ग्राहकांना बेकायदा दारु पिण्यास जागा उपलब्ध करणे व बेकायदा बाबींकडे नियंत्रण न आणणार्‍यांवर गस्त घालून कठोर कारवाई करावी. त्यानंतर बेकायदा बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची दक्षता संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी घ्यावी. मद्यविक्रीची परवानगी असताना दुकानाच्या जागेवर व परिसरात मद्यपी दारु पिताना आढळ्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. एमआरपीप्रमाणे मद्यविक्री न करता जादा दराने विक्री करणार्‍या लायसन्सधारकावर कारवाई करावी. नियमभंग करणार्‍या लायसन्सधारकांविरुद्ध दर महिन्याला अचानक परजिल्ह्यातील व दुसर्‍या क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या सहाय्याने संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी मोहीम राबवून राज्य दारुबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी.

- Advertisement -

दुसर्‍या कार्यक्षेत्रातील किंवा परजिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी उलट तपासणी किंवा निरीक्षणात तीन किंवा जास्त वेळा नियमभंग नोंदविले असतील तर संबंधित लायसन्सधारकाविरुद्ध कारवाईसाठी सविस्तर प्रस्ताव तात्काळ विहित प्राधिकरणासमोर सादर करावा. ज्या अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात वारंवार उलट तपासणी प्रकार उगडकीस न आल्यास त्यांच्या चांगल्या नियंत्रणाची नोंद वार्षिक गोपनीय अहवालामध्ये सकारात्मक करावी. लायसन्सधारकांची वारंवार तपासणी व निरीक्षणाची गुणवत्ता याबाबत संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी निर्देशांची अंमलबजावणी करावी. त्यासाठी दरमहा सखोल आढावा घ्यावा व कामचुकार अधिकार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. नियमभंगाची प्रकरणे संबंधित अधीक्षकांनी ४५ दिवसांमध्ये निकाली काढावी. अंतिम निर्णयाची अंमलबजावणी १० दिवसांमध्ये करावी. याप्रकरणी दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी माहिती पाठवावी. विभागीय उपआयुक्तांनी वेळेत माहिती उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करावी. हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, याची दक्षता संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी घ्यावी. निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -