घरक्राइमवर्षभरात नाशिकमध्ये २९ खून, ६५ बलात्कार, ४३ प्राणघातक हल्ले

वर्षभरात नाशिकमध्ये २९ खून, ६५ बलात्कार, ४३ प्राणघातक हल्ले

Subscribe

गुन्हेगारी आलेख चिंताजनक; संघटीत गुन्हेगारीत काहीशी घट

नाशिक : शहरात गुन्हेगारी घटना कमालीच्या वाढल्या असून, २०२१ मध्ये तब्बल ६५ बलात्कार आणि २९ खून झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याचबरोबर प्राणघातक हल्ल्यांच्या ४३ घटना घडल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, चेनस्नॅचिंगच्या ६५ हून अधिक घटना घडल्या असल्याने नाशिककरांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
बहुचर्चित आनंदवली खूनप्रकरणानंतर पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाई सुरु करत तब्बल १०८ जणांवर मोक्का कारवाई केली. यानंतर वर्षभरात संघटित गुन्हेगारीचा आलेख खालवला.

नोव्हेंबरअखेर संघटित गुन्हेगारीतून दोन खूनाच्या घटना घडल्या. मात्र, गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी आलेख पाहिल्यास तो निश्चितच चिंताजनक असल्याचे दिसते. २०२० मध्ये ३ हजार २३५ गुन्ह्यांची नोंद झाली, तर २०२१ मध्ये २ हजार ५७५ गुन्ह्यांची नोंद झाली. बलात्कार गुन्ह्यांची संख्या २०२० मध्ये ५७ आणि २०२१ मध्ये ६५ आढळून आले. त्यामुळे वर्षभरात आठने बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

भूमाफिया टोळीवर पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी मोक्का कारवाई केली. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मोक्का कारवाईस वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शिक्कामोर्तब केले. वर्षभरात मोक्का, तडीपारी कारवायांमुळे नाशिक पोलीस राज्यात चर्चेत राहिले. मात्र, शहरातील खून, बलात्कार, चोर्‍या, प्राणघातक हल्ले या घटनांतील वाढ पाहता नाशिककरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुन्हेगारी घटना अशा…

- Advertisement -

शहरातील विविध पोलीस ठाण्यांत डिसेंबरअखेर २९ खुनाच्या घटना घडल्या. त्यातील ९७ टक्के गुन्हे उघड झाले आहेत. तर, प्राणघातक हल्ल्याचे एकूण ४३ गुन्हे दाखल करुन हे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. मंगळसूत्र खेचून नेण्याच्या ६५ घटना घडल्या. त्यातील २२ घटना उघड झाल्या आहेत. तर, विनयभंगाचे ८८ गुन्हे दाखल होऊन ८५ उघड झाले आहेत. बलात्काराचे ६५ गुन्हे उघड झाले आहेत. तर फसवणुकीच्या ११५ पैकी फक्त ५४ गुन्ह्यांचीच उकल झाली आहे.

२०२१ मध्ये वर्षभरात गुन्हेगारी कमी झाली आहे. मोक्का कारवाई केल्यानंतर डिसेंबरपर्यंत संघटित गुन्हेगारीच्या घडना घडल्या नव्हत्या. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर राज्याच्या तुलनेत नाशिक शहरात गुन्हेगारीचा आलेख उतरता होता. वर्षभरात फसवणूक व विनयभंगाचे प्रमाण इतर वर्षांच्या तुलनेत कमी आहेत. – दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -