घरमहाराष्ट्रनाशिकबाप्पाच्या उत्सवाला आर्थिक मंदीची झळ

बाप्पाच्या उत्सवाला आर्थिक मंदीची झळ

Subscribe

अनेक मूर्तीकारांनी कामगारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत मूर्तीच्या किंमती न वाढवता ‘जैसे थे’ ठेवल्या

आर्थिक मंदिच्या वातावरणामुळे कामगार वर्गाचे पगार अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे गणेश मूर्ती खरेदीवरही या मंदीचा प्रभाव आढळला. अनेक मूर्तीकारांनी कामगारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत मूर्तीच्या किंमती न वाढवता ‘जैसे थे’ ठेवल्या. अनेकांनी दरवर्षापेक्षा कमी दराची मूर्ती खरेदी करण्यास पसंती दर्शविली. असे असले तरीही बाजारात प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी केली. दुसरीकडे सार्वजनिक गणेश मंडळांनाही यंदा अल्प वर्गणीत समाधान मानावे लागले.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. नाशिकमध्ये महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, मायको, क्रॉम्प्टन आणि सिएट या प्रमुख कंपन्यांसह अन्य छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये मंदीमुळे उत्पादन कमी झाले आहे. अनेक ठिकाणी लेऑफ सुरु आहे. लेऑफच्या काळात कामगारांना पूर्ण वेतन न मिळता केवळ दिवसाचे बेसिक वेतन मिळते. त्यामुळे संबंधितांचा महिन्याचा ताळमेळ बिघडला आहे. अनेक कंपन्यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांची संख्याही कमी केली आहे. त्यामुळे अनेकांवर ऐन उत्सव काळात बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्याचा थेट परिणाम उत्सवकाळातील बाजारपेठेवर झाला आहे. महागाच्या मूर्ती खरेदी करण्यावर यंदा फारसा भर दिला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मूर्तीकारांनीही भक्तांचा ‘मूड’ बघून मूर्तीच्या किंमती न वाढवण्यावर भर दिला. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वर्गणीलाही मंदीची झळ लागली आहे. व्यापारीवर्ग आणि बांधकाम व्यावसायिकांनी मंदीचे कारण देऊन वर्गणीत आपला हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळत आहे. महागाईची झळ सर्वसामान्यांप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांनाही बसत आहे.

- Advertisement -

अंकुर गणेशसाठी वेटिंग लिस्ट

मनोवेध डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि सृष्टी गणेश संस्थेने पर्यावरणीय गणेशोत्सवाची चळवळ चालविणार्‍या पर्यावरणप्रेमी मित्रांनी अंकुर गणेश अशा दोन प्रकारच्या पर्यावरणपूरक मूर्ती भाविकांना उपलब्ध करून दिल्या. या मूर्ती भाविकांच्या पसंतीस उतरल्या असून नाशिकरोड, कॅनडा कॉर्नर, इंदिरानगर आणि त्र्यंबकेश्वर येथील सृष्टी गणेश स्टॉल्सवर त्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली. काळी तसेच लाल माती, कंपोस्ट खत आणि बीज टाकून अंकुर गणपती मूर्ती साकारण्यात आल्या होत्या. या मूर्तींना भाविकांच्या पसंतीची पावती मिळाली असून, पुढच्या वर्षीसाठी आताच अनेक भाविकांनी नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.

कामगारांच्या भावना न दुखवता मूर्तींच्या किंमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला.

‘‘वाढत्या महागाईमुळे गणपती मूर्तींच्या किंमती वाढणे स्वाभाविक आहे. परंतु औद्योगिक मंदीमुळे कामगार वर्गाची महाग मूर्ती खरेदी करण्याची यंदा क्षमता नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आम्ही कामगारांच्या भावना न दुखवता मूर्तींच्या किंमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरीही आम्ही यंदा बनवलेल्या ४५० मूर्तींची विक्री रविवारीच पूर्ण झाली.’’  – शांताराम मोरे, शाडू गणपती उत्पादक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -